पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८)

वर्ष सूर्यमान वर्षाशी जुळविण्यासाठी आहे हे जरी खरें, तथापि या महिन्यास मलमास किंवा अशुद्ध महिना असे शास्त्रकारांनी ठरवून त्या महिन्यांत नित्य नैमित्तिक धर्मकृत्यांबाहेर लग्न, मुंजी वगैरे शुभ कृत्यें करूं नयेत असें ठरविले आहे. अधिकमासमाहात्म्य व इतर ग्रंथ रचून या महिन्यांत अनेक व्रतें व दानें करण्याबद्दल शास्त्रकारांनी सांगितले आहे. अधिकमासामुळे एक महिनाच वाढून दरसालचा खर्चही वाढतो, अशा समजुतीनें गरीब स्थितींतील लोक काळजीत असतात. दुष्काळांत तेरावा महिना ही म्हण प्रचारांत येण्याचें कारण तरी हेंच आहे कीं, एक महिन्याचा खर्च अधिक चालविण्याचा बोजा प्रापंचिकांवर अधिकमासामुळे पडतो, अशी चुकीची समजूत आहे. ज्या देशांतील हिंदु पूर्वजांनी सूर्यचंद्रनक्षत्रादिकांचें सूक्ष्मरीत्या अवलोकन करून कालमानाचे माप योग्य प्रकारें ठरवून दिले त्यांच्या वंशजांत अज्ञानाचा प्रादुर्भाव होऊन भल- त्याच धर्मकल्पनांचा समाजावर पगडा बसावा, यापरतें शोचनीय काय आहे?

 वर सांगितलेलीं महिन्यांची नांवें कार्लेकरून लुप्त होऊन नवीन नांवें प्रचारांत आलीं. हिंदुधर्मशास्त्रांतील बहुतेक धर्मकृत्यांचा संबंध तिथीशी अर्थात् चांद्र- मानाशीं आहे. संक्रांतींसंबंधी कृत्यें मात्र सौरमानाच्या मासांवर अवलंबून आहेत. बंगाल व मद्रास इलाख्यांतील तामीळ प्रदेश व मलबारप्रांत खेरीजकरून इतरत्र चांद्रमानाप्रमाणेंच वर्ष गणतात. महिन्याचा प्रारंभ मानण्याची पद्धतिही एकाच प्रकारची नाहीं. तथापि सामान्यत्वें प्रतिपदा ज्या दिवशीं सूर्योदयीं असेल त्या दिवशीं चांद्रमासाचा प्रारंभ होतो असे मानतात. सूर्य व चंद्र एका ठिकाणीं येतात तेव्हां अमावास्येचा अंत होऊन मास पूर्ण होतो. कांहीं ठिकाणीं चांद्रमास पौर्णि- मांत व कांही ठिकाणी अमावास्यांत किंवा अमांत आहेत. सूर्याभोंवतीं पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण होण्यास जो काल लागतो त्याचा बारावा भाग तो सौरमास. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. तथापि सूर्यच प्रत्येक सौरमासीं स्थान बदलतो, असा भास होतो. हीं जीं बारा महिन्यांची बारा स्थानें त्यांस आकाशांतील नक्षत्र- पुंजांच्या खुणांवरून नांवें देण्यांत आली आहेत; त्यांस राशी असे म्हणतात. मेष, वृषभ वगैरे बारा राशी आहेत. चंद्राच्या सांवत्सरिक गतींत जीं २७ नक्षत्रें ठरविण्यांत आली, त्यांपैकी कांहीं नक्षत्रांचा उदय प्रत्येक मासाच्या पौर्णिमेस होत असतो. त्या नक्षत्रावरून चांद्रमासास नांव देण्यांत आलें. उदाहरणार्थ चित्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा चैत्री या नांवानें ओळखली जाऊन, चैत्री ज्या महिन्यांत आहे तो चैत्र. अशा रीतीनें कृत्तिका, मृगशीर्ष, पुष्य, मघा, फल्गुनी, चित्रा,