पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(

७)

ल्यास माहिती आहे. यावरून दिसून येईल कीं, अधिक मासाचें पूर्ण ज्ञान त्या काळीं होतें व सौरमास न गणतां चांद्रमासच गणीत असत.

अधिकमास.

 पृथ्वीभोंवतीं चंद्राची एक प्रदक्षिणा संपण्याला जो काल लागतो, त्याला चांद्रमास असे म्हणतात. याप्रमाणे त्याच्या बारा प्रदक्षिणा होण्यास अजमासें ३५४ दिवस लागतात. पृथ्वीची सूर्याभोंवतीं एक प्रदक्षिणा पूर्ण झाली म्हणजे १ वर्ष संपतें. त्यास ३६५ दिवस, ५ तास, ४८. मिनिटें, ४७॥ सेकंद इतका काल लागत असल्यामुळे सहजच दरसाल चांद्रमान व सौरमान वर्षांत अजमार्से ११ दिवसांचें अंतर पडतें. हे अंतर वाढूं न देतां प्रत्येक तिसऱ्या वर्षी एक महिना वाढवून सौरमान वर्षाशीं चांद्र- मान वर्षाचा मेळ घालून घेतला जातो. हा जो वाढविलेला महिना त्यालाच अधिकमास असें ह्मणतात. प्रत्येक महिन्यास सूर्य एका राशींतून दुसऱ्या राशीत गेल्याप्रमाणे वाटतो. या भासमान सूर्याच्या गतीस संक्रमण ह्मणतात. असे संक्रमण किंवा संक्रांती बारा आहेत. चैत्र महिन्यांत मेष, वैशाखांत वृषभ याप्रमाणे एका वर्षात मीनपर्यंत १२ राशींचा सूर्य उपभोग घेतो. अर्थात् बारा सूर्यसंक्रांती होतात. ( मकरसंक्रमण हा सण पहा.) परंतु चांद्रमासामुळे कधीं कधीं असे होतें कीं, एकाद्या महिन्यांत संक्रमणच घडत नाहीं; ह्मणजे दोन संक्रांतींच्यामध्यें दोन अमावास्या येतात. अशा महिन्यास अधिकमास मानतात. चैत्रापासून आश्विन महिन्यापर्यंत मात्र अधिकमास येतो. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ य चार महिन्यांत कधींही अधिकमास नसतो. क्वचित प्रसंगी फाल्गुनांत अधिक मास असतो.

 यावरून दिसून येईल की, ज्या महिन्यांत सूर्यसंक्रांत नाहीं तो अधिक मास आहे. कधीं कधीं एकाच चांद्रमासांत दोन सूर्यसंक्रांती होतात. त्याला क्षयमास असे म्हणतात. पूर्वीच्या अधिक मासापासून पुढचा अधिक मास होणें तो तिसाव्या महिन्यापासून आठ किंवा नऊ महिन्यांमध्ये कोणता तरी होतो. एकशें एकेचाळीस वर्षांनी किंवा एकोणीस वर्षांनीं क्षयमास होतो; तो कार्तिक, मार्गशीर्ष, पौष या महिन्यांतून कोणता तरी होतो. ज्या वर्षी क्षय- मास होतो, त्या वर्षी क्षयमासाच्या पूर्वी एक आणि क्षयमासानंतर एक असे दोन अधिक मास होतात. अधिक व क्षयमासाची योजना केवळ चांद्रमान