पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या वसुंधरेवरील जीवन हे एकच आहे. त्यामुळेच पूर्वी ऋषीमुनींची एवढेच काय परंतु आदिवासी लोकांची सुद्धा अशी श्रद्धा होती की वृक्षवल्ली व प्राणी एकमेकात संवाद साधू शकतात. मुळात कोणीही कोणाचा शत्रू नसतो. सहजीवन हाच येथील जीवनाचा स्थायीभाव आहे. या जीवनात चढ-उतार आहेत. जीवनात विकार यावयाचेच; कारण तोही जीवनाचा एक भाग आहे. या विकारापासून मुक्ती मिळवणे हेही ओघाने आलेच. विकार अगदी आदिम कालापासून येत आले आहेतच. मानवानेही त्यावर निसर्गनिर्मित पाला, फळे, खनिजे यापासून औषधनिर्मिती केली. आयुर्वेद हा आपला भारतीयांचा ठेवा. आजही त्यातील अनेक औषधे अत्यंत गुणकारी आहेत. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान व पूर्वीचे पिढ्यान्पिढ्या मिळालेल्या अनुभवाचा संगम करणे आपल्याला का शक्य असू नये? 'मी आधुनिक म्हणून मी श्रेष्ठ' हा अहंभाव निश्चितपणे हानिकारकच आहे.
 आजच्या शास्त्रातील अत्यंत महत्त्वाची उणीव म्हणजे मनाचा विचार. आयुर्वेद व होमिओपाथी यांत त्याला प्रथम स्थान दिले गेले आहे. मानसिकता, विकार व अध्यात्म यांचे किती जवळचे संबंध आहेत, याची खऱ्या अर्थाने आपणास जाणीवच नाही. ज्ञानी, विद्वान व गुरुसमान व्यक्ती आपल्याला उपदेश करत असतात. अनेक ग्रंथ हेही फक्त आपले मित्रच नाहीत तर गुरुसमानच असतात. प्रवचन आपण अगदी भाविकपणे ऐकतो, ग्रंथ श्रद्धेने वाचतो, पण ते जीवनात प्रत्यक्ष किती उतरते? हा प्रश्न आपणच आपणास विचारावा. नाहीतर प्रवचन ऐकणे म्हणजे या कानाने ऐकावयाचे व नंतर सर्व विसरून जावयाचे. ग्रंथाचे शब्द कळले पण त्यांचा आत्मा म्हणजे ज्ञान आपल्यात किती सामावले? हल्ली निरनिराळ्या प्रकारची अध्यात्मावर आधारित अनेक शिबिरे भरतात. अनेक आधुनिक मंदिरे निर्माण झाली आहेत. परंतु त्यामुळे आपली अनैसर्गिक, तथाकथित आधुनिक परंतु आरोग्याला शत्रुवत अशी जीवनशैली बदलून निसर्गाला मित्र मानून त्याच्या नियमानुसार आपण आपली दैनंदिनी आखतो का? असे अनेकानेक प्रश्न इतरांनी नव्हे तर आपले आपणच स्वतःला विचारावयाचे असतात. गुरूंनी उत्तम विचार दिले, ज्ञानसत्र चालू केले, पण आपण त्याचे नुसते बहुधा कर्मकांड करतो.

 अध्यात्म म्हणजे पुराणे, काल्पनिक, अव्यवहार्य, विज्ञानात न बसणारे असे काहीही नाही. अध्यात्म म्हणजे आत्माच्या जवळ जाणे, त्याला जाणणे. हे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, मी कोण आहे हे समजावून घेणे होय. आत्मा आणि ब्रह्म हे

१०