पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समानार्थी दोन शब्द आहेत.
 मनाची खऱ्या अर्थाने व्याख्या करणे, ते जाणून घेणे हे अतिशय कठीण काम आहे. आजच्या मानसशास्त्राला सुद्धा मर्यादा आहे. खऱ्या अर्थाने मनाला रूप नाही, गंध नाही, आकार नाही, पण अफाट शक्ती मात्र आहे हे अनेक प्रकारे सिद्ध झालेले आहे. प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते तरीही सर्वांचे मन एक आहे, शक्तीही तीच आहे. प्रश्न असा उरतो की काही जणांच्या बाबतीत ही शक्ती पूर्णत्वाने जागृत होते, तर काही जणांच्या बाबत काहीच घडत नाही. वैद्यकशास्त्रात या शक्तीचा उपयोग विकारमुक्ती व आरोग्यासाठी करून घेण्याचे प्रयत्न हल्ली जोरात चालू आहेत. पण वैज्ञानिक अभ्यासात या यशाच्या निश्चितीचे फारसे निष्कर्ष मिळत नाहीत. डॉ. लीशान सारख्या अनेक ज्ञात्या व्यक्तींनी केलेल्या अभ्यासाचे हे निष्कर्ष आहेत. म्हणजे मनाला अद्भुत शक्ती आहे पण ती सर्वांनाच प्राप्त का होत नाही? ही खरी समस्या त्या अभ्यासकांच्या पुढे होती. मी स्वत: काही वैज्ञानिक नाही, एक सामान्य माणूसच आहे. परंतु मला अनेक वेळा चिंतनामधून अशी उत्तरे मिळतात, तसे याचेही अंधुक उत्तर मिळाले आहे.
 या समस्येचे उत्तर शोधण्याकरिता अनेक पैलूंचा विचार करावा लागेल. यश १००% ते ०% टक्के या पल्ल्यामध्ये आहे. यात अनंत घटक, ज्यांना आपण ‘इन्फिनिटी’ (Infinity) म्हणू, अशी रूपे सापडतील. याला उत्तर फक्त उत्कृष्ट सांख्यिकच (Statistician) शोधू शकतील. नुसत्या शेकडो रुग्णांचा अभ्यास करून ते मिळणार नाही. हे अस्थिर घटक जास्तीत जास्त ओळखून मगच उत्तर सत्याच्या जवळपास पोचेल. याचा संबंध नाडी व श्वास यांच्याशी निश्चित आहे व ते पुढे येणार आहे.

 हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे आपण तशी निसर्गाची लेकरे. या ब्रह्मांडामधून शरीर बनवणाऱ्या अनेक घटकांच्या जुळणीमुळेच शरीर तयार होत असते. पण नुसते शरीर म्हणजे मानव अथवा कोणताही प्राणी नव्हे. त्याला जिवंतपणा देणारी, जीवन देणारी काहीतरी शक्ती असते, ती काय असते हेच मुळी गूढ आहे. यालाच अध्यात्मात आत्मा, ब्रह्म अशी संज्ञा दिली गेलेली आहे. पाश्चात्यांनी यालाच 'सोल' (Soul) असे म्हटले आहे व मन हेही त्याचेच रूप आहे. मन जर त्यामुळे आदिशक्तीचा एक अणू असेल तर ते जाणून घेणे हेच महत्त्वाचे,

११