पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनोगत



 गेल्या दीडशे वर्षांत मानवाने एवढी प्रगती केली आहे की आपण थक्क होऊन जातो. यातही गेल्या लढाईनंतर (१९३९ ते ४५) केली गेलेली प्रगती आश्चर्यकारकच म्हणावी लागेल. परंतु ही सर्व प्रगती आधिभौतिक आहे. तरीही एवढी प्रगती करून माणूस सुखी झाला आहे का हा खरा प्रश्न आहे. प्रगती कशासाठी व कोणासाठी? यातून किती लोकांचे खरे कल्याण झाले व किती लोक बरबाद झाले? यांची उत्तरे आपणा सर्वांना आपल्यातील विचारवंतांनी दिलेली आहेत. एकूणच आपली विनाशाकडेच चाल चालू आहे असे दिसते. गेल्या पाऊणशे वर्षांत घडलेले बदल मी स्वतः पाहिले आहेत. आजच्या मानाने त्या वेळी काहीच सुविधा नव्हत्या. तरीही माणूस सुखातच होता. भोवतालचा परिसर अतिशय बहरलेला होता. वाहने फारशी नव्हती. अनेक खेड्यांतील लोकांनी आगगाडीसुद्धा पाहिलेली नव्हती. त्या वेळी लोक दहा-वीस मैल प्रवास सहज पायी करत असत. या भागासलेपणालाही एक सुंदर जीवनाची कोर होती. आज मात्र प्रगतीबरोबरच हळूहळू दुःखाचा काळोखच आपली जीवने व्यापू लागला आहे. जीवनाचे सौंदर्य व त्याचा उन्नत अर्थ हळूहळू नष्ट होत चालला आहे.

 वैद्यकशास्त्रही याला अपवाद नाही. या शास्त्रात व तंत्रात तशी डोळे दिपवणारी प्रगती झाली आहे. परंतु यातही आपण काय मिळवले व काय गमावतो आहोत या विचाराने मन गोंधळून जाते. असे म्हटले जाते की आपल्या जीवनाला काही अर्थ आहे किंवा असा अर्थ म्हणजेच जीवन. या पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीमागे काही अर्थ आहे - उद्देश आहे. मानव, प्राणी, वृक्षवल्ली, ग्रह, तारे अशा अनंत गोष्टींमागे सहज न दिसणारा पण प्रत्यक्ष असणारा असा काही अर्थ आहे. किंबहुना एकूणच