पान:आरोग्यविज्ञान.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ रात्रीं हवा शुद्ध करण्याचें काम झाडें करीत नाहींत, व ती अशुद्ध करण्याच्या कामी मात्र माणसांना आणखी दिवे मदत करितात. दिवा जळण्यास ऑक्सिजन वायूच लागतो व तो जळतांना कर्बोनिक अॅसिड वायूच उत्पन्न होत असतो. निजतांना आपल्या आंगावर वाऱ्याचा झोत न येतां तो खोलींत खेळता रहावा याविषयीं खबरदारी घेतली पाहिजे. म्हणजे वान्यामुळे शिरशिरी भरून ताप न येतां खच्छ हवेचा मात्र पुरवठा होईल. संध्याकाळी राहत्या जागेंत ऊद, धूप, चंदन वगैरे जाळून हवा शुद्ध करण्याची व तींतील रोगबीज नाहींसें करण्याची पद्धति आरोग्यकारक आहे, कारण चंदनाच्या धुरानें रोगजंतु मरतात, चिलटें पळून जातात व डांबर, गंधकासारखी घाण न सुटतां सुवास सुटतो. आजारी मनुष्याला निरोगी मनुष्यापेक्षां शुद्ध हवेची जास्त जरूर असते. आजारी मनुष्याच्या खोलींत मुबलक हवा व उजेड येऊं देणें हें निम्मे औषधच होय. निजतांना तोंडावरून पांघरूण घेऊन आपल्याच विषारी उच्छ्वासांत घुसमटत राहणें अगदीं अनिष्ट होय.