पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आदिवासी विद्यार्थी जीवन

 आदिवासी हे सुधारलेल्या व सुखसोयीनीयुक्त अशा जगापासून शेकडो मैल दूर राहतात. आदिवासींमध्ये लिखित वाडमयाची परंपरा नाही. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्याच्या जीवनात आर्थिक, सामाजिक, मानसिक कुचंबणाच आहे. म्हणूनच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे व त्यांना अधिक मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे.

 आदिवासी जीवनात शिक्षणाच्या मागासलेपणाची पाळेमुळे आपल्याला खोलवर रुजलेली दिसतात. जगणे आणि शिकणे याचा संबंध काय असतो हेच या आदिवासीला उलगडले नाही. जसे आपण जगलो तशी आपली मुलेही शिक्षण न घेताच जगू शकतील अशी त्याची समजूत आहे. मोल मजुरी करून हातावर मिळवायचे आणि पानावर खायचे. त्यामुळे स्वातंत्र्य मिळून बराच कालावधी उलटला तरीही ह्या दरिद्री माणसाची लंगोटी अद्याप कायम आहे. मुलाला शिकविण्यापेक्षा त्याला कामाला जुंपून त्याचे लग्न करुन देणे म्हणजे आपली जबाबदारी संपली असे ते मानतात. परंपरेने चालत आलेली दारु पिण्याची सवय, आपल्या मुलांना लावण्यात त्यांना आपण काही गैर करतो, असेही वाटत नाही. याचा अर्थ आदिवासी कुटंबातील विद्यार्थ्यांना स्वतःचे नशीब स्वतःच काढावे लागते. पालकांकडून शिक्षणाची प्रेरणा सध्यातरी मिळण्याजोगी परिस्थिती नाही. उलट त्यांच्या काही अंधश्रध्देमुळे “भगत वाक्य प्रमाणे" याचा अनुभव येतो व शिक्षणात अडसर निर्माण होतो. आदिवासी मुलगा शिकू लागला तर त्याच्या पालकाला ते भारभूत वाटते. कारण शेती कामात, घर कामात, कमाईत त्याची. मदत घेता येत नाही. निसर्गाच्या सानिध्यात वाढल्यामुळे आदिवासी मुले लहानपणापासूनच स्वच्छंदी साहसी व भटकी बनतात त्यांना शिक्षण ही एक निरर्थक व कंटाळवाणी बाब वाटू लागते.

भौगोलिक व सांस्कृतिक अंतर :

 आदिवासी विद्यार्थ्याच्या जीवनात केवळ भौगोलिक नाही तर सांस्कृतिक अंतरही आहे. नदीच्या प्रवाहातील स्वतंत्र बेटांप्रमाणे हे आदिवासी विद्यार्थ्यांचे

९४