पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सासरच्या घरी ग आई मी ताई कुणाला म्हणू
म्हण ग म्हण ग लेकी तुझ्याच ग नंदेला.

 या गीतात "अर्थोही कन्या परकीय एवं !” ही कण्वाची व्यथा टिपली आहे. माहेरवाशीण जेव्हा सासरी जाते तेव्हा ती व्याकुळ होते. तीला आपले घर आणि • नाती गोती आठवतात. या गीतात अत्यंत मौलिक उपदेश सासूरवाशिणीला केला आहे. यापुढे तू मी आई बाबा कुणाला म्हणू ? असा प्रश्न न विचारता सासू सासयालाच आई बाबा म्हण, असे समजावले आहे. त्याचप्रमाणे दीराला भाऊ म्हण व नणंदेला ताई म्हण. तात्पर्य सासर न मानता तेच आपले माहेर मान हे गीत आजही उद्बोधक आहे.

हळदीन भरलंय पातळ बायचं

हळदीन भरलंय पातळ बायचं पातळ ग लग्नाचं
दोन दिवसाची आई बायची सासू ग जन्माची
दोन दिवसाचा बाप बायचा सासरा ग जन्माचा
दोन दिवसांची बहीण बायची नणंद ग जन्माची
दोन दिवसाचा भाऊ बायचा दिर ग जन्माचा
लग्नात बायनो उपास धरला उपास ग नवऱ्याचा

 लग्नात हळद लागते तेव्हाच माहेर सुटतं म्हणून यापुढे विवाहित स्त्रीने माहेरच्या माणसांना विसरून सासरची माणसे जवळ करावीत, हा बोध या गीतात आहे. आई, बाप, बहीण, भाऊ ही दोन दिवसाची असून आता या आमच्या विवाहितेला सासू सासरा, नणंद, दीर जन्माचे मानावे लागणार आहेत. नवऱ्याचा उल्लेख मात्र मोठ्या खुमासदार रीतीने शेवटच्या ओळीत केला आहे. नवयाच्या प्राप्तीसाठी नवस उपास तापास हिने केले होते आणि म्हणूनच तो योग प्राप्त झाला आहे.