पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'दसरा' म्हणजे अश्विनामधला सण, अंबामातेचा नवरात्र उत्सव. या नऊ दिवसात तुळशीच्या झाडावर दररोज एक याप्रमाणे माळ बांधतात. आपले कुलदैवत घरी बसले असे मानले जाते. या दिवसात उपवासही धरले जातात. देवाला नवस.. पुरवले जात नाहीत. विशेष म्हणजे मुली एक तांब्या घेऊन त्यात अनेक फुले कणसे, एकत्र करून तांब्यात खोचून साडी नेसून हातात कांड्या टिपऱ्या घेऊन गावोगाव प्रत्येक दारी जाऊन गाणे सांगून जोगवा मांगतात. त्या गाण्याला भोंडवाय म्हणतात. त्या ठिकाणी -
'तुझ्या माझ्या अंगणी
चाफा लावू चांदणी
चाफ्याला पाणी घालूनी
चाफा आला भरासी
चाफा आला भरासी
कळून कळी वाटली
कळून कळी वाटली
एक कळी गळाली
एक कळी गळाली
तीच कळीवेचूनी
नवशा हार मी गुंफिला
नवश्या हार गुंफून
देवीला मी वाहिला. '

 असे गाणे गातात. नवव्या दिवशी मागून आणलेले धान्य जोगवा त्याचा नैवेद्य देवीला वाहतात. तो दिवस म्हणजे दसरा. दसरा म्हणजे घरी बसलेले देव सुटे करण्याचा दिवस, चेंडा, गांवदेवी, मही, चव्हाट्या, मुंड्या या अनेक देवांना शेंदूर फासून पूजा केली जाते. पूर्वी अनेक ठिकाणी रेडा मारला जात असे. परंतु सध्या काही ठिकाणी कोंबडा, बकरा, यांचा बळी देतात. सायंकाळी आपढ्यांच्या पानांची पूजा करून एकज़ण दुसऱ्याला ती पानं देतात. पाय धरतात. भेटी गाठी घेतात.आनंदी आनंद चोहीकडे पसरवितात. असा हा जव्हारचा दसरा सण पाहण्याजोगा- अनुभवावा असाच आहे.

७१