पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लोकसंवादासाठी माध्यम : थाळगान


 आदिवासींच्या विकासासाठी आणि लोकशिक्षणासाठी सर्व थरांवर निकराचे प्रयत्न होत आहेत. शासन स्वयंसेवी संस्था व सामाजिक बांधिलकी मानणारे कार्यकर्ते कार्यरत आहेत. सर्वांचे लक्ष्य आदिवासी विकास असले तरी आदिवासींच्या पारंपारिक, उपजत कलांकडे पाहिजे तेवढे लक्ष वेधले गेलेले नाही. वस्तुतः लोकशिक्षणासाठी आदिवासींच्या सर्वच कला आदर्श माध्यम म्हणून स्वीकारता येण्याजोग्या आहेत. त्यासाठी या कलांचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास होणे गरजेचे आहे. त्याचा दुहेरी फायदा होवू शकतो. आदिवासी कला, जीवन आणि संस्कृतीचे जतन आणि संरक्षण यामुळे होवू शकेल, आणि लोकशिक्षणासाठी या कलांचा वापर केल्यास परंपरा सांभाळतच उत्तम तऱ्हेने आदिवासी समाज प्रबोधनही साधू शकेल.
लोककला आणि लोकप्रबोधन :
 लोककला आणि लोकप्रबोधन या दोन गोष्टी भिन्न न मानता त्यांची सांगड कशी घालता येईल. याचा विचार कलावंत आणि प्रबोधनकार यांनी एकत्र बसून करण्याची ही योग्य वेळ आहे. कारण, एकूण समाजजीवनात फक्त आदिवासी समाज त्यातही विशेष करून कातकरी समाज अधिक मांगे असल्याचे ध्यानात आले आहे. तेव्हा कलाकार आणि प्रबोधनकार यांनी एकत्र येवून कला आणि जागृती यांचे नाते जोडले पाहिजे.
 अशाच भूमिकेतून या ठिकाणी लोकशिक्षणासाठी गवसलेले थाळगान हे अत्यंत परिणामकारक माध्यम आहे असे लक्षात येते. म्हणून थाळगान या कलेचा परिचय येथे करून देत आहे.
थाळगान :
 थाळगानसाठी कोणतेही किंमती वाद्य किंवा दुर्मिळ साधनसामुग्री लागत नाही. त्याच्या नावातच त्याची सामुग्री आलेली आहे. एक थाळा आणि त्याच्या

आधाराने सादर केलेले गाणे म्हणजेच गीतात्म कथानिवेदन.

६५