पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आदिवासी लोकसाहित्याचा मूलगामी अभ्यास होण्याची गरज एवढ्यासाठी की त्यात भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब पुरेपूर उमटलेले आहे. वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत या सारख्या ग्रंथातील किती तरी व्यक्ती, प्रसंग, घटना, कथा, विचार यांचे ठसे आदिवासी लोकसाहित्यात उमटलेले सुस्पष्टपणे दिसतात. या वनवासी साहित्याचे संकलन व प्रकाशन फार उद्बोधक ठरणार आहे. अद्याप आदिवासी साहित्याच्या संकलनाचे प्राथमिक काम देखील पूर्ण झालेले नाही. त्याची पूर्तता झाल्यास नव्याने अनेक गोष्टी उलगडतील.

आदिवासी साहित्य चळवळ :-

 आज आदिवासींचे साहित्य विपुल प्रमाणात निर्माण होत आहे. मात्र अत्यंत विरळ स्वरूपात, कचितच त्याला प्रसिध्दी मिळत आहे. आदिवासी साहित्य फारसे प्रकाशित होत नाही. तशी सुविधा उपलब्ध नाही, यंत्रणा नाही. याचा अर्थ आदिवासी साहित्यच निर्माण होत नाही असे नाही. कदाचित हे साहित्य खेडोपाडी हस्तलिखित स्वरुपात पडून असेल आणि लेखक, कलावंत अलक्षित स्वरूपात आपले जीवन जगत असतील. संकोच, गरिबी, आणि धीटपणाचा अभाव यामुळे हे सारे कचे लेखन त्यांच्या जमातीपुरतेच मर्यादित राहते. आणि तेथेच तोंडी गायले आणि हस्तलिखीत वाचले जाते. केवळ एवढ्यासाठीच या साहित्यिकांचे एकत्रिकरण, संघटन आणि त्यांच्या साहित्याची जुळवाजुळव, संपादन आणि सार्थ-सदीप प्रकाशन करणे महत्त्वाचे व गरजेचे आहे. त्यातून मराठी वाड्.मयालाही नवे लेणे गवसेल.

आदिवासी साहित्यिकाच्या चळवळीची दिशा:-

 या आदिवासी साहित्यिकाच्या एकत्रिकरणासठी आणि त्यांच्या साहित्याला उजेडात आणण्यासाठी आदिवासी साहित्याची चळवळ निर्मळ, निखल, विशुध्द हेतूने, राजकारणापासून अलिप्त ठेवून, उभी करणे गरजेचे आहे. त्यासाठी तालुकावार आणि जिल्हावार संघटन करणारे लेखक, साहित्य-कला अवगत असलेले संघटक, नियुक्त केले पाहिजेत. त्यांनी या आदिवासी लेखकांची नाव, पत्ता, लेखन तपशीलासह सूची तयार केली पाहिजे आणि या लेखकाचे भन्यस्वरूपात मेळावे भरविले पाहिजेत. प्रथमतः तालुकापातळीवर, त्यानंतर

५४