पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खर्च करून तुला हवे ते घेऊन देतो. चोळी, बांगड्या काहीही माग. मागशील ते घेऊन द्यायला मी तयार आहे. या प्रकारच्या भावना व्यक्त करणाऱ्या लोकगीतांत मग अनेक भेटवस्तूंची दागदागिन्यांची नावे गोवून ते रंगत जाते. लोकगीत उत्स्फूर्तपणे खुलतच जाते. डफ किंवा पावा या जोडवांद्यांच्या तालावर पावले टाकून नादमय, भारावल्या वातावरणात ते लोकगीत, प्रेमगीत बनून प्रियकर गाऊ लागतो. इतर समवयस्क मित्र मैत्रिणीही मग त्या गीताला साथ करतात,ताल धरतात आणि त्या नृत्यात रंगून जातात.
 'विडा मिळून खा क ऊ .....,
  विडा मजूत खा के ऊ ...' असे बेभान होऊन म्हणतात. समूहानेच ही गीतं गायची असतात. मग त्यातील भावनाही समूहरूप घेऊन साकारते, सगळ्यांची बनते. सणवार, उत्सव असले की नृत्य, वादन, गायन यांच्या एकाच ताल-सुराला बहर येतो. लिंगभेद न मानता स्त्री पुरुष वावरतात, एकत्र नाचतात-गातात.

 परधाणांच्या 'नारायणोन' म्हणजे नारायण देवाच्या गीतात माशा, गोमाशा घेऊन आलेल्या शंकराने पार्वतीसारखा सुंदर हिरा झोळीत घालून पळवून नेल्याचे वर्णन आहे. मुलगी मनपसंत असल्यास संगनमताने विवाह करण्याची रूक्मिणी सुभद्रा यांची पुराण परंपरेने टिकून राहिलेली रीत जतन केल्याची साक्ष ही लोकगीते आपल्याला देतात.

 वहाडी नाचात मुलगी नवऱ्याघरी जाणार आहे. त्यामुळे घरचे, गावचे सगळेच दुःखी अंतःकरणाने मुलीची समजूत काढतांना म्हणतात- जो रडो हों माँ इ, का, केडाले जुकनारो, आय १ आज नेते, काल आमू हूँ, हमूज वाटी की जाणार हाय (जा पोरी रडू नकोस हे का कोणाला चुकणार आहे ? आज ना उद्या आम्हीही त्याच मार्गाने जाणार आहोत) हा त्यांच्या खडतर जीवनातला ओलावा जाणवतो. शेवटी तिच्या मैत्रिणी, 'रुमाले निशाने भोविजे' म्हणतात. निदान, मुली तुझा तेवढा रुमाल तरी आम्हाला निशाणी म्हणून सोडून जा ग म्हणतात.

 अशा या बहारदार रान मेव्याचे, लोकगीतांचे दंग करणारे हे वास्तव आहे. जीवनाच्या अंगांना ही लोकगीते स्पशून जाणारी आहेत.

४७