पुन्हा ती कथा असते श्रावणबाळाची वा रामायणातील किंवा महाभारतातील एखादी कथा-उपकथा असते. वैशिष्ट्य म्हणजे ही कथा असते ग्रामीण, सभोवतालच्या निरक्षर, अडाणी माणसालाही समजेल अशा बोलभाषेतील,जिवंत रसरशीत अनुभवाला साकार करणारी, विविध रसांचा करूण गंभीरतेसह आविष्कार करणारी ही कथा, कोणत्याही संदर्भासाठी कधी अडत नाही. परंपरा सांगते तेच श्रावणाच्या आईवडिलांचे नाव होते. विठ्ठलपंत आणि रखुमाईसंशोधनाची वादंगं नाहीत, आहे ते स्वीकारून कथेकरी मध्यभागी आणि सभोवती गोलाकार समुदाय. माणसांचा फड जमतो. रात्रभर कथा रंगते आणि लोकही रंगतात, असे आहे ते अजब थाळगान : एक नमुना !
बोहाडा :.
कुठे बोहाडा आहे याची चर्चा गावकरी करीत असतात. हा बोहाडा म्हणजे देवी जगदंबेचा उत्सव. या उत्सवात वेगवेगळ्या प्रकारची देवादिकांची सोंगे मुखवटे घालून, वेशभूषा परिधान करून आणली जातात. संबंधित देवाचा मुखवटा परंपरेनेच घालणे त्या व्यक्तीकडे चालत आलेले असते, मग त्या सोंगानुसार त्याची नाचण्याची एक वेगळीच चाल असते आणि त्याला अनुरूप साजेशी वाद्याचीही वेगळी ढब असते. गणपती, बहिरोबा, हिरवा देव, अहिरावण, वेताळ, नृसिंह, दुंदुभी, म्हसोबा, नारद, सारजा, गावदेवी, लक्ष्मी आणि सरतेशेवटी पहाटेच्या वेळी नाचत येते ते जगदंबेंचं सोंग.अशी सारी सोगं रात्रभर जागतात. खेड्यापाड्यावरचे लोक, रात्रभर जागून ही सारी सोंगं पाहून, पायी चालत पुन्हा, आपापल्या गावी परततात. बोहाडा म्हणजे त्या गावची एक जत्राच. त्या निमित्ताने खाऊं, मिठाईची, फुगे खेळण्याची गावकऱ्यांच्या नित्योपयोगी वस्तूंची दुकाने विक्रीसाठी लागतात. त्या नाचण्यातील बेहोषी आणि धुंदी केवळ अतुलनीय म्हणावी लागेल. तेथे सारे कष्ट शीणभार हलका होतो. दारिद्रय आणि गरिबीचा विसर पडतो, माणुसकीला पाझर फुटतो, कौटुंबिक सुखदुःखे वाटून घेतली जातात, नवा हुरूप आणि नवी उमेद घेऊन मंडळी परततात.
तारपा:
आदिवासींमध्ये लोकप्रिय असलेला तारपा नाचही लक्ष वेधून घेणारा आहे.