पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आदिवासी लोकसाहित्य


आदिवासी लोकसाहित्य - अन्य कोणत्याही साहित्या पेक्षा वास्तववादाने युक्त, वस्तुस्थितीचे निदर्शक, लोकसंस्कृती आणि परंपरेचा वारसा पुढे चालविणारे, लोकांनी जतन करून ठेवलेले, शतकानुशतके चालत आलेले, असे हे लोकवास्तव आहे.
लोकसाहित्य हे निर्विवादपणे वास्तवपूर्ण साहित्य आहे. त्यातील लोकजीवन म्हणजे लोकसाहित्यातील वास्तव. लोकमानसाचा आविष्कार लोकसाहित्यात होतो. एका समष्टीच्या (समूहाच्या) मनाची ती अभिव्यक्ती असते. त्यातून . लोकजीवन,लोकविया, लोकसंस्कृती, लोकविधी, लोकश्रध्दा, लोकभ्रम यांचे 'वास्तवपूर्ण दर्शन घडते.
लोकसाहित्यातील वास्तव निश्चितपणे आपल्या आगळेपणाने उठून दिसते. लोक म्हणजे 'पिपल' (People) , समानध्येय, विचार उद्दिष्टे , व्यवसायनिमित्ताने एकत्र आलेले नागरी व ग्रामीण भागातील समुदाय. त्या त्या . समुदायाचे लोकांच्या कळपांचेही, एक आगळे मानसशास्त्र असते. लोकसाहित्यात . या विविध गटांचे वेगवेगळे वास्तव साकार झालेले आढळेल.

ग्रामीण पातळीवरील लोकांचे लोकमानस लोकसाहित्यात अवतरले ते अस्सल ग्रामीणतेचा बाज घेऊन ! जात्यावरच्या पहाटे गावयाच्या ओव्या, दळण कांडणाची गीते, पिंगा, झिम्मा, फुगडी, कोंबडनाचसारखी खेळगीते, नागपंचमी, बारसे विवाह- मर्तिक-दसरा-दिवाळी अशा प्रसंगात म्हणावयाची सणवार विधींची गीते, ढोलनाच-थाळगान-बोहाडा-वग-तमाशा-गोंधळ-जागरण-ललित-दंडार-भारुड-. वासुदेव-दशावतार-भुत्या-भोप्या यासाऱ्या सोंगाना वठवताना, त्या त्या प्रसंगाला , अनुकूल अशी गीते आणि लोकवैद्यक -लोकाश्रित-कला-तंत्रमँत्र-लोकविश्वास या साऱ्यांमध्ये, लोक-साहित्यातील वास्तव प्रतिबिंबीत झालेले आहे. अन्य . कोणत्याही साहित्यापेक्षा वास्तववादाने युक्त, वस्तुस्थितींचे निदर्शक, लोकसंस्कृती आणि परंपरांचा वारसा पुढे चालविणारे लोकांनी जतन करून ठेवलेले शतकानुशतके चालत आलेले असे हे लोकवास्तव आहे.

४२