पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 परधानांच्या नारायणी म्हणजे नारायण देवाच्या गीतात, माशा, गोमाशा घेऊन आलेल्या शंकरानं पार्वतीसारखा हिरा झोळीत घालून पळवल्याचं वर्णन आहे. मुलगी पळवून नेऊन तिच्याशी विवाह करण्याची पूर्वापार रीत, रुक्मिणीसुभद्रा- हरणाची आठवण व्हावी अशी ही लोकगीतं आपल्याला करून देतात.

 वऱ्हाडी नाचात मुलगी नवऱ्या घरी जाणार आहे, त्यामुळे घरचे गावचे सगळेच दुःखी अंतःकरणाने मुलीला समजूत काढतांना म्हणतात -
  जो रडो हो माँ भी, का, केडाले, जुकनारो, आय ?
  आज ने ते, काय आयू हूँ, इयज वाटी की, जाणार हाय.
  (जा पोरी ! रडू नकोस हे कां कोणाला चुकणार आहे ! आज ना उद्या आम्हाही त्या मार्गाने जाणार आहेत.) हा त्यांच्या खडतर जीवनात ओलावा जाणवतो. शेवटी मैत्रिणी 'रुमाले निशाने थोबिजे' म्हणतात. निदान, मुली तुझा रुमाल तरी आम्हाला निशाणी म्हणून सोडून जा.

  वनवासींच्या अशा या बहारदार पण थोड्याच लोकगीतांचं संकलन झालेलं आहे. ती लोकगीतं त्यांच्या नित्य जीवनाच्या विविध अंगांना स्पर्शून जाणारी आहेत. या लोकगीतांच्या संकलनाचे काम निष्ठेनं व्हायला पाहिजे.

६. आदिवासींच्या लोककलेत साधारणपणे कोणकोणत्या सणांना प्राधान्य आहे?
 आदिवासींच्या वसंतोत्सवात पुढील सणात लोककलांना उत्तेजन मिळते.
 १. मकरसंक्रांत - त्यांच्यात हळदी कुंकू नाही, पण तीळगुळ घ्या गोड गोड बोला' म्हणतात.
 २. बीजा - म्हणजे द्वितीयेची चंद्रकोर या दिवशी उंडी तयार करतात. भाताच्या वाफेवर कणिकेत गुळ घालून ही उंडी तयार करतात.
 ३. होळी - सणही मोठ्या उत्साहात साजरा होतो. कोठेही कामासाठी असला तरी आदिवासी घरी होळीला परततोच. पैसे नसले तर गावी तो कित्येक मैल पायी चालत येतो.
  ४. गुढीपाडवा - या सणाला त्याच्या झोपडीसमोर कलश रांगोळी-सजावट असते. तांदळाच्या पीठाची धिर्डी करून ते खातात.

३८