पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदिवासी लोकांनी आपले देव वाघदेव, पांढरदेव, हिरवादेव, नारायण देव मानले आहेत. या देवदेवतांनीच ग्रामदेवता रुढ केल्या आहेत. या ग्रामदेवतांची पूजाअर्चा करून त्यांना प्रसन्न करुन घेतले की आपल्या जीवनात कधी आपत्ती येत नाही अशी त्यांची समजूत आहे. या समजुतीला का होईना पण त्याचा आचारविचार या ग्रामदेवतांनी शहरी माणसांच्या तुलनेत विशुध्द राखलेला आहे. उदा. कातकरी या आदिवासी जातीची वाघ ही मुख्य देवता आहे. या ग्रामदेवतेची ते पूजा बांधतात. तर गोंड लोक दुल्हादेव, पेरसा, पेण, नुरमा, गंगड, रानतान बडियाताळ, बडादेव, इत्यादी देवतांना भजतात, महत्त्वाचे म्हणजे या ग्रामदेवतांच्या उत्सवात लहान मोठे, गरीब श्रीमंत असे भेदभाव उरत नाही हे महत्वाचे आहे. पेरसा पेन म्हणजे मोठा देव, काली देवी हे गोंडाचे देव आहेत. खंडोबा, बहिरोबा, आदिदेवता तडवी ही आदिवासींची एक जात मानते, भस्मदेव हा दुबळा या जमातीचा देव आहे. याशिवाय मरीमाता, वराई माता आदिमाता अशा देवता दुबळा जमात मानतेच. या ग्रामदेवतांना कोंबडे, बकरे वा इतर पक्कान्नाचे नैवेद्य दाखविले जातात. भिल्ल समाजात वाघ देव, शिवल्यादेव, नागदेव, खंडोबा, म्हसलेबाबा, बहिरोबा, मरी आई, आसरा इत्यादी देवता मानल्या जातात. ही सारी त्यांची ग्रामदैवतेच आहेत.

 गावाच्या देवतांना आपण ग्रामदेवता म्हणतो. आपल्या भारतामध्ये खेड्यांची वस्ती पूर्वापार चालत आलेली आहे. अनेक माणसांचे कळप खेड्यामध्ये स्थाईक होतात. अशा लोकांच्या पूजा उपासनेच्या देवतांना ग्रामदेवता ही संज्ञा प्राप्त झालेली असावी, आदिवासींच्या सर्व जाती जमातींमध्ये ग्रामदेवतांची मंदिरे म्हणजे खेड्याला साजेशी साधारण छोटी व बिनखर्चाची असतात. एखादे मोठे झाड पाहून त्या झाडाच्या छायेत लाकडी वा दगडी मूर्ती कोरलेली असते. त्यावर एक बसके, झोपडेवजा उणपाऊसापासून संरक्षणासाठी छप्पर उभारलेले असते. विशेष म्हणजे ग्रामदेवतांचे पुजारी म्हणून पूर्वी कनिष्ठ व अस्पृश्य मानलेल्या जातीतील लोकांनाही मान वा अधिकार दिलेला आहे.

 प्राचीन ग्रंथातही ग्रामदेवतांचे उत्सव आणि निवास यांच्या वर्णनात अनुसूचित जाती जमातींचा उल्लेख आलेला आहे.

३२