पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चिंता नाही. आपल्या गावात दुष्काळ असला तरी पाहुणे म्हणून गावाच्या गांव दुष्काळ पीडीत नसलेल्या गावी जाऊन सुखाने राहू शकतात. समजा तेथील रसद संपलीच तर ती दोन्ही गावे, तिसऱ्या ठिकाणी जातात. एरव्ही कणगीत दाणा भरलेला असल्यावर आकाशाकडे पाहात आळसात दिवस घालवतात. म्हणूनच म्हण आहे की, 'कणगीत दाणा तर भिल उताणा', गावात एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर मंदिर बांधत असतील, बोहाड्यासारखा उत्सव असेल तर जे वर्गणी देऊ शकत नाहीत असे लोक पैशाच्या मोबदल्यात आपले श्रम देतात. म्हणजे एखाद्या सधन सावकाराकडे स्वतःला त्याच्या शेतीच्या कामात बांधून घेतात व तो मालक त्याच्या वाट्याचे पैसे वर्गणी देतो. एव्हढेच काय, मातृसत्ताक पध्दतीप्रमाणे मुलीला देण्यासाठी तांदूळ, दागिने देहज या रुपात देतात. हुंड्याची ऐपत नसल्यास तो सासऱ्याकडे घरोंदा म्हणून रहातो. दोन तीन वर्षे शेतीत राबतो. परतफेड होताच स्वाभिमानाने बाहेर पडतो. विवाहित स्त्रीच्या मनात अन्य पुरुषाबद्दल भाव निर्माण झाल्यास व्यभिचार मान्य नसून सरळ विवाहाला परवानगी आहे. गावपंचायत बसून तिथेच काडीमोड घेतात. स्त्रीदाक्षिण्य, औदार्य एव्हढे की पूर्वीच्या पतीपासून राहिलेल्या गर्भाच्या पालनाच्या जबाबदारीसह स्त्रीला पटल्यावर स्विकारतात. विवाहासाठी लागणारा खर्च झेपत नसल्यास विवाहाअगोदरच एकनिष्ठेने राहण्याची परवानगी आहे. आणि नंतर झालेल्या मुलाबाळांच्या साक्षीने लग्नही लावतात. 'काज'मध्ये देखील सामुदायिक श्राध्द घालून झाल्यानंतरच लगेच विधुर पुरुष व विधवा स्त्री यांची लग्ने जमविली जातात. ती ही केवळ पदरांत एखादा रुपाया बांधून भाताचे पिंड परवडत नाहीत तर मातीचे पिंड करतात. या प्रथेतून दोन विस्कटलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन होते आणि दोन्ही घरे उभी राहतात. जातिभेद आणि विषमता प्रत्यक्षात हे समाज मानत नाहीत. एव्हढेच काय पण नवीन भाजी डोंगरावरील शेतात आल्यास 'कवळी भाजी' नावाचा सण साजरा करतात. म्हणजे सगळ्यांनी बसून शेजारी नातेवाईक परिचित यांना बोलावून पहिल्यांदा ती भाजी खातात आणि तिथून मग भाजी खायला सुरुवात करतात. शेतातील धान्य पहिल्यांदा देवीला वाहतात. या प्रसंगांमधून एकात्मता, विषमता रहित संस्कृतीचा प्रत्यय येतो. म्हणूनच असे म्हणता येईल की लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची विशेष तीव्र गरज असून त्यात समरसतेचे प्रवाह रुजले आहेत.

२९