पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'काज' नावाचा सामुदायिक ‘श्राध्द' विधीही जोरात असतो. शेवटी वर्षभरातील विधवा आणि विधुर पुरुष यांचे पुनर्विवाह जुळवून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न होतो. त्यात अनेकांचे भले झाले आणि संसार उभारले गेले आहेत. गरोदर स्त्रीशीही लग्न करुन मनाचा मोठेपणा दाखवण्याची क्षमता याच आदिवासींमध्ये आहे. पूर्वीच्या घरोब्यातून या गरोदर स्त्रीला झालेल्या मुलाला ‘ओढ्या' म्हणून आनंदाने या मुलाला नवा पती वाढवितो. स्त्रीदाक्षिण्य आणि औदार्याचे एवढे दुर्मिळ उदाहरण जगात शोधूनही सापडणार नाही.

 त्यांच्या म्हणी, वाक्प्रचार, उखाणे, कूट यात साहित्य गुण आहेत, पर्यावरण आहे, शास्त्र आहे. लोकगीत आणि लोककथा रंगतदार आहेत. ही लोकगीते गात राहावी वाटतात आणि कथा सांगत राहाव्या आणि श्रोत्यांनी ऐकाव्यात अशा आहेत. हे सगळं जपण्याची आणि जतन करण्याची आवश्यकता आहे. संस्कृतीच्या मुख्य प्रवाहात हा मागासलेला ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाज आणताना त्यांच्या सुसंस्कारित मनाचा आणि उदात्त संस्कृतीचा विचका होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
 उदा. - ठाणे जिल्ह्यातील आदिवासीमध्ये किंवा कोणत्याही आदिवासीमध्ये सामान्यतः खालील तीन गोष्टी शोधूनही आढळणार नाही:
१. आदिवासी उपाशी राहतो पण कधी भीक मागत नाही. आदिवासी भिकारी नाहीत. सकाळपासून संध्याकाळ पर्यंत उपाशी राहून तो काम करील, चकार शब्द बोलणार नाही, पण मला भूक लागली असे कधी म्हणत नाही.
२. आदिवासींमध्ये वेश्या व्यवसाय नाही.
३. आदिवासी कधी चोरी करीत नाही.

 सामान्यतः अशी ही स्थिती आहे. संगणकाच्या युगात एकविसाव्या शतकात, उद्योगीकरणाच्या फेऱ्यात वाहतूक आणि दळणवळणाच्या शोधात आणि सुविधात नागरी ठाणे विभाग गुंतला असला तरी ठाणे जिल्ह्याचा हा आहे दुसरा अदृष्य चेहरा तो या लेखाने थोडा प्रकाशात आणता आला त्यात समाधान आहे.

२६