होतात. मलिदा मिळतो; पुन्हा त्या धनिक दुकानदारालाच आणि सधन गावकऱ्याला.
शिक्षणाबद्दलची उदासीनता :
आश्रमशाळा आणि वसतिगृह तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी मिनशरी वृत्तीने चालू केलेली वनवासी क्षेत्रातील कामे लक्षात घेऊनही असे आढळते की अद्यापही या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पालकांचे पाल्याविषयी दुर्लक्ष आहे. या पालकांचा मुलांच्या शिक्षणात सहभाग शून्य प्रमाणातच आहे. बेरिस्ता, मेढे सारख्या भागात शेतीकामामुळे मुलांना शाळा सोडावी लागते. झाप, हिरडपाडा, सारख्या भागात धाकट्या भावंडांना सांभाळण्यासाठी मुलांना घरी ठेवतात. तर मोखाडा भागात शिक्षणाने मुलांना करणी केली जाते, तो जगत नाही, त्याला नजर लागते अशा समजुती आहेत. हुशार मुलेही बापाच्या अडाणी पणाचा फायदा घेऊन शिकायला घातलं की 'पोट दुखत' हा सोपा उपाय सांगून घरी बसतात. एकदा एका मुलाचं पोट मी खरच डॉक्टरकडून तपासलं तर त्याची ती लबाडी असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरही म्हणाले की पोट दुखत म्हटल्यावर कोणालाच काही कळत नाही आणि बोधही होत नाही. मुले शिक्षण टाळायचे असले की असा बहाणा करतात. आदिवासी मुलामुलींना मूळातच रानात मोकळं मुक्त राहण्याची सवय, रिकामं हिंडायचं आणि रानचा वारा पीत हुंदडायचं अशीवृत्ती. मग वसतिगृहाच्या नियमात आणि शाळा कॉलेजमध्ये बसून तासातासात गुंतून राहायचे आवडत नाही.
एका आश्रमशाळेत तर असे आढळले की शिक्षकांनी मुलांचे पालक कधीच पाहिलेले नाहीत कारण ते दरीत राहतात. आणि दरीतूनच मुलांना आश्रम शाळेत पाठविले, कधीतरी नवे धान्य निघाले की ते देवाला वाहायला वाजत गाजत दरीतून बाहेर येतात. आणि पुन्हा गायब होतात. अशी ही शिक्षण स्थिती आहे. आज ठाणे शहरातील मुलाला ९०% गुण मिळवून देण्यासाठी धडपडणारा सुविद्य पालक कुठे? आणि त्याच ठाणे जिल्ह्यातील दरीत दडलेला हा आदिवासी पालक कुठे? असे हे विषम चित्र आहे.