पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभ्यासनीय आहे. ठाणे जिल्ह्यात आदिवासींच्या एकूण ८ जाती आढळतात. महादेव कोळी, कोकणा, वारली, ढोर कोळी, मल्हार कोळी, क ठाकूर, म ठाकूर, आणि कातकरी. यामध्ये काहिसे शिकलेले व नौकरीमध्ये वर्ग १ वर्ग २ च्या जागा पटकावणारे पदवीधर आढळतात. पण तुलनेने अन्य जाती मागासलेल्या आहेत. त्यातील कातकरी जात तर शिक्षणा पासूनही वंचित आहे. अद्यापही कातकरी लोक मेलेल्या ढोराचे मास खातात असे म्हणतात.

  या जाती जाती मध्येही तसे अंतर आहेच. एकदा मागासवर्गीय जात म्हटली की निदान सर्व मागासवर्गीय जातीत तरी एकोपा एकजूट आपल्याला अपेक्षित असते पण तशी वस्तुस्थिती नाही. अत्यंत कडवेपणाने हा उपजाती पोटभेदही दुर्देवाने अस्तित्वात आहे असे जवळून पाहिले, त्यांच्यात मिसळून समजून घेतले, तर लक्षात येते याचे एकच उदाहरण दिले तर ते पुरेसे होईल. एकदा एका लहान मुलांच्या वसतिगृहात गेलो नामोल्लेख उचित नव्हे, तर तेथील मुले जेवण करणार नाही असे म्हणत होते. कारण नेहमीचा कामाठी आचारी, उपलब्ध नव्हता आणि एका कातकारी बाई कडून आज स्वयंपाक करवून घेतला होता. मला धक्काच बसला. एवढीशी लहान लहान मुले वसतिगृहात सुधारण्यासाठी तथाकथित समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणलेली. त्याना सुशिक्षित आणि सुसंस्कृत करायचं आणि समाजाकडून गोळा करुन आणलेल्या पै-पैशावर धान्यावर चालणारे हे वसतिगृह तेथील मुले म्हणत होती, आम्ही कातकरी बाईने शिजवलेले अन्न खाणार नाही - आम्हाला ते चालत नाही. जर या ठिकाणी दुसऱ्याच्या मेहरबाणीने राहणाऱ्या वसतिगृहात ही जातीयता विषमता तर मग गावात काय परिस्थिती असेल. शिवाय खूप वाईटही वाटले की कोणत्या थरापर्यंत हा जातीयवाद पेरला गेलेला आहे. यातून आपली सुटका कशी होणार? कधी होणार?

 अठरा विश्व दारिद्राचीच सोबत :
 अद्यापही खोलवरच्या फारतर एखादी एस.टी. बस दिवसभरात येऊन जाणाऱ्या अतिग्रामीण अशा एखाद्या पाड्यावर तुम्ही गेलात तर तेथे आपल्याला कमालीचे अठराविश्व दारिद्र आढळेल. लंगोटी लावून उघडे बंब लोक झाडावर चढून विळ्याने सरपण काढतांना दिसतात. नदीवर बाया बापड्या उघड्याने आपले

२०