Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठाणे जिल्ह्याचा बहुसंख्य भाग तसा अदृश्य आहे. तो चहरा लोकांना माहितीच नाही. उद्योगिकरण, व्यापारी भरभराट तंत्रज्ञानाचा विकास, शैक्षणिक विकास, लोकसंख्येचा विकास हे सगळे शहरी वातावरणात नजरेत भरते. वाहतूक आणि दळणवळण वाढीचा वेगही लक्षात येतो. पण ठाणे जिल्हयाचा एक फार मोठा भाग आदिवासी वनवासी गिरिजन वसाहतींनी व्यापलेला आहे. हे किती लोकांना ठाऊक आहे. जवळून परिचित आहे.

 आदिवासी वस्तीचा मोठा टापू :
 डहाणू , पालघर, वाडा, जव्हार, तलासरी, मोखाडा, शहापूर असा सात तालुक्यांचा एक फार मोटा पट्टा हा आदिवासी वस्तीचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात आहे. त्यात विक्रमगड, सूर्यानगर यांसारखी महत्त्वाची गावे आहेत. या सगळ्यांसाठी एक स्वतंत्र जिल्ह्याचे खास आदिवासी ठिकाणच असावे असा विचार गेल्या काही वर्षात सतत पुढे येत आहे. किंबहुना या सगळ्या तालुक्यांमधून डहाणू ते नाशिक अशी एक रेल्वे लाईन टाकून रेल्वे खेळविली पाहिजे म्हणजे हा भाग सर्वांना परिचित होईल. आणि ज्याला प्रस्तुत लेखात अदृष्य चेहरा म्हटले आहे, तो ठाणे जिल्ह्याचा चेहरा सर्वांना सुपरिचित होईल.

 स्वतंत्र वनवासी विद्यापीठाची क्षमता :
 जव्हार, मोखाडा, सूर्यमाळ, देवबांध, विक्रमगड, वाडा, पालघर, तलासरी, शहापूर, उहाणू, सूर्यानगर, कासा, मनोर यासगळ्या भागांना एका धाग्यात गुंफणारे एक स्वतंत्र वनवासी आदिवासींसाठी एक विद्यापीठ नव्याने स्थापण्याची गरजही आहे, असे म्हटल्यास ते अनाठायी होणार नाही. कारण आदिवासी संस्कृती कला, शिक्षण, समाज, जीवन याचा सांगोपांग अभ्यासाचे स्वतंत्र दालन एखादे आदिवासी विद्यापीठ स्थापन करून उघडता येईल. त्याची तेवढीच आवश्यकता व गरजही आहे. आदिवासी विद्यापीठासाठी सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून या ठाणे जिल्ह्यातील सूर्यानगर वसाहतीचा उल्लेख करता येईल.

 आदिवासी जीवन आणि संस्कृती :
 ठाणे जिल्ह्यातील आदिवासींचे जीवन त्यांची कला, त्यांची संस्कृती विशेष

१९