पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रामीण जीवनात रमत नाहीत आणि नागरी जीवनात जमत नाही अशी स्थिती होते.

उद्योजकतेसाठी लागणाऱ्या वृत्तीचा अभाव :

  समजा बँकेचे कर्ज घेऊन, सिकॉम किंवा महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे (महावित्त) विशेष अनुदान घेऊन काही छोटा मोठा उद्योग सुरू केला तरी, आदिवासींना आपल्या परंपरा, सणवार, संस्कृती जपणे स्वाभाविक महत्त्वाचे वाटते. त्यामुळे उद्योगप्रियता आणि सतत अहोरात्र न थांबता, जे कष्ट, उद्योग उभारतांना प्रारंभी अपेक्षित असतात, तो ते करू शकत नाही. कुणीतरी आपल्याकडून मुकादमी करून काम करून घेण्याची सवय, अंगवळणी पडलेली त्यामुळे बेसावध राहतो. शेवटी स्वतःचे उद्योगापेक्षा रोजंदारीची नोकरी बरी,कर्ज-व्याज फुगते, खर्च भागत नाही कारण अपेक्षित उत्पादन नाही. शेवटी घेतलेली मशीन विकायची तयारी असते.

खरेदी विक्री व्यवस्थेचे अज्ञान :

 आपल्याला लागणारा कच्चा माल किफायतशीरपणे आदिवासी क्षेत्रात कोण पुरवू शकेल, पोहोचं देईल, कोणत्या प्रमाणात खरेदी केली तर ते विशेष भावशीर होईल, याचे ज्ञान नसते. कोदून, कधी खरेदी करावी. पत नसल्याने कोणी उधार देईल काय हे सगळेच आदिवासी क्षेत्रातील उद्योजकांच्या पुढे प्रश्न असतात. बरं आयात उत्पादन एवढ्या अडीअडचणीतून जरी त्याने तयार केली तरी जाहिरात कला ही कलियुगातील १५ वी विद्या त्याला पारखी असते. तयार केलेला माल खपवायचा कसा ? कोण मोठ्या प्रमाणावर खरेदी करणार ? घाऊक विक्री व्यवस्था नाही. वाहतूक खर्च वाचविण्याचे कौशल्य अवगत नाही. आपली तयार केलेली वस्तू ओरडून विकण्याची फिरून विकण्याचा संकोच वाटतो. अशा परिस्थितीत ज्याला आयात मार्केटिंग म्हणतो त्याची सांगड घालणे जमत नाही. शासनाकडून, आदिवासी विविध मंडळांकडून एका मर्यादेपलिकडे हातभार लागत नाही. आणि त्यांना विशिष्ट मर्यादेतच असे सहकार्य देणे शक्य असते. परिणामी माल उठत नाही. गोडाऊनमध्ये पडून राहतो आणि उद्योजकातील धमक खचू लागते.

१५०