Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जव्हारचे दिवस ..........

 १९८३ च्या जून मध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीने आदिवासी, अतिग्रामीण भागात महाविद्यालय सुरू करून आदिवासींच्या उच्च शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. या महाविद्यालयाचा आद्य संस्थापक प्राचार्य म्हणून संस्थेचे सेक्रेटरी डॉ. मो. स. गोसावी यांनी (एक आजीव सदस्य म्हणून) मोठ्या विश्वासाने माझी नियुक्ती केली. एका अर्थाने हा संस्थेचा फार मोठा अनुग्रह मानतो. त्यामुळेच आदिवासी, वनवासी भागाशी एवढा जवळून संबंध आला. त्यांच्याशी अतूट नातेही जुळले.

 जव्हारमधील उण्यापुऱ्या ९ वर्षाच्या वास्तव्यात आदिवासींच्या सान्निध्यात मी निर्भय झालो. उद्याची चिंता आदिवासी बांधव करीत नाहीत. आपण मात्र अकारण करीत बसतो. त्यांना पेन्शन, ग्रॅज्युएटी, काही नसते तरी रात्र जागविणारा तारपा ढोल नाच त्यांना आनंदाने धुंद करीत असतो.

 आदिवासींचे जीवन पाहिले, अनुभवले आणि आदिवासींमध्ये रमता आले, त्यांची सारी सुखदुःखे जवळून अगदी एकट्याने अनुभवली. दारूच्या नशेत वावरणारे, दारिद्रय, अडाणीपणावर मात न करू शकणारे, लग्नाला पैसे नाहीत म्हणून घरजावई बनून शेतात कष्ट करणारे,पैशा अभावी विवाहापूर्वी एकत्र राहणारे, बुध्दिमत्तेची विलक्षण चमक डोळ्यांत घेऊन वावरणारे, परिस्थितीने रंजले गांजले तरी शहाणपण अंगी बाणलेले, भूक दडवून मरेपर्यंत कष्ट करणारे, गळफास घेतला तरी शांतपणे पोलीस ठाण्यातून सुटका कशी व्हावी यांचा प्रयत्न करणारे, लंगोटी लावून उघड्या अंगाने झाडावरुन राव करण्यासाठी झाडपाला तोडणारे, नोटा मोजण्याचा आर्थिक व्यवहार न उलगडणारे, हिरव्या आणि लाल रंगाच्या नोटा असे एकेक मोजणारे, डींग विकून कांदे घेणारे आणि मध विकून मीठ घेणारे, रजिष्ट्रर पाकीट पोष्टाच्या डब्यात टाकणारे, डोळ्यातला मोतीबिंदू बाभळीच्या काट्याने काढू पाहणारे, शिक्षणाला, 'पायातल्या उन्हापासून संरक्षण करणाऱ्या वहाणाची' उपमा देणारे, प्रामाणिकपणाच्या साऱ्या कसोट्यांवर टिकणारे, भीक न मागणारे, गरोदर स्त्रीचाही पुनःर्विवाहासाठी स्वीकार करणारे, ओढ्या उत्सव सणवार साजरे करण्यासाठी कष्टाच्या मजुरीच्या पैशाला झुगारून गावची वाट

१५