पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारणांमध्ये निश्चितच अर्थ आहे. शिक्षण म्हणजे काय याबद्दलही खालील उत्तरे मिळाली.

 जीवन जगण्याची कला म्हणजे शिक्षण, कुटुंब म्हणजे काय, समाजात काय चालले आहे वाचणे, लिहिणे, माहिती मिळवणे ज्याच्यामुळे मान मिळतो ते. समाज सुधारणा होते, ज्ञान मिळते, देशात काय चालले ते समजते, अशी मौलिक उत्तरे दिली. तर काहींनी प्रामाणिकपणे शिक्षण म्हणजे काय विचारले, तर साहित नाही असे सांगितले. तर काहींनी शिक्षण म्हणजे पैसा, नोकरी, सुसंस्कार, व्यवहार, नीटनेटकेपणा, हिशोबीपणा, अंधश्रध्दा निर्मूलन यावर भर दिला.

 आश्रमशाळा म्हणजे किंवा वसतिगृह म्हणजे काय ? ते कशासाठी असते ? या प्रश्नांची उत्तरे चांगली मिळाली, शिक्षणासाठी राहाण्याचे ठिकाण त्यामुळे शाळेत वेळेवर जाता येते. शासनाकडून मोफत राहण्याची व जेवणाची सोय, गोरगरिबांना रहाण्याचे ठिकाण, चांगले वळण लावण्यासाठी, आदिवासींच्या शिक्षणाची केलेली सोय असे सांगितले. कचित आश्रमशाळा व वसतिगृहाबद्दल माहिती नाही असेही आढळले. १३५ पैकी ९७ महिलांनी आपल्या मुलांना शिकायला ठेवले आहे. तर ३८ महिलांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले नाही. यावरुन पाल्यांना शिक्षण देणाऱ्या वा न देणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या महिला आढळतात.

 शिक्षणाचे फायदे या महिलांनी पुढीलप्रमाणे सांगितले. शिकल्याने उत्पन्न मिळते, समाजात चांगले राहाता येते, देण्या घेण्याचे व्यवहार, पत्रव्यवहार कळतात, स्वाभिमानाने उदरनिर्वाह करता येतो. आदिवासी महिलांचे अगोदरच असलेले महत्त्व आणखी वाढते, कुटुंबाची प्रगती होते, फसवणूक टळते, ज्ञान मिळते, अंधश्रध्दा कमी होते, इतरांना वाचून दाखविता येते, शासनाच्या योजना समजून त्याचा लाभ घेता येतो. नवीन अनुभव मिळतो, देशात काय चालले ते समजते, अन्याय दूर करता येतो, शहाणपण येते, विचार करता येतो. चांगले दिवस येतात, जगातल्या बातम्या समजतात, जास्त प्रवास करता येतो, चांगले संस्कार होतात, संसार सुखी होतो, तर काही स्त्रीयांना, जाहिराती वाचता येतात.

१३२