Jump to content

पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षणाचा गंध न जाणे वगैरे असे आहेत. त्याचेही नेमके परिष्करण केले जाते, तर बरे झाले असते.

 आदिवासी, वनवासी ह्या शब्दांबाबतही प्रस्तुत अभ्यासकाची भूमिका धरसोडीची अशी आहे. वनवासी शब्द जर डॉ. गिरधारी यांना पटून अन्वर्थक वाटला असता तर त्यांनी त्याचा स्वीकार करून, ग्रंथाचेच नाव, 'आरसा : वनवासी जीवनशैलीचा' असे ठेवायला हरकत नव्हती. पण मनातून ते अनिश्चित असावेत. खरे तर ह्या देशात आपण ज्यांना भटके, विमुक्त, टोळीवाले, जंगली, नेटिव्ह, वनवासी वगैरे म्हणतो ते मूळ निवासी, आदिनिवासीच आहेत. आक्रमकांनीच त्यांना वनवासी अज्ञानी व कणवेची चीज बनवले आहे हे कारण त्यामुळेच बाजूलाच पडते.

 त्या आदिवासींमध्ये काम करणाऱ्या मिशनऱ्यांबद्दलही काही लिहिण्यापेक्षा, माणसे धर्मांतर का करतात? हा प्रश्न स्वतःशी विचारून आपल्या सदोष वर्तनाचा हा परिणाम आहे अशा त-हेच्या नोंदींची मला डॉ. भास्कर गिरधारी यांच्यासारख्या संयत अभ्यासकाकडून अपेक्षा होती.

 पण ह्या मला व्यक्तिशः जाणवणाऱ्या त्रुटी असूनही डॉ. भास्कर गिरधारी यांचा 'आरसा : आदिवासी जीवनशैलीचा !' हे पुस्तक अत्यंत लक्षवेधी आणि वैशिष्ट्यपूर्ण असेच वाटते. कारण ह्या लेखनात अनुभवसिध्द प्रांजळ अभ्यासक, अत्यंत तळमळीने आणि पोटतिडकीने शब्दबध्द केला गेला आहे. त्यांनी स्वतःच एके ठिकाणी नोंद केली आहे, आदिवासी आयुष्याबद्दलच्या अनेक समस्या अनुत्तरीत आहेत.

 हा अनुत्तरीत प्रश्नांचा छडा लावण्यासाठी प्राचार्य डॉ. भास्कर व्यंकटेश गिरधारी यांच्यासारख्या समृध्द अनुभवांच्या कार्यकर्त्या शिक्षकी पेशातल्या, समाजसुधारकाने अधिक सखोल चिंतन व मांडणी करुन आमच्यासारख्यांना ह्या विषयाचे सर्वंकष मंथन करणारा नवा मार्गदर्शक आदर्श ग्रंथ द्यावा अशी अपेक्षा बाळगतो. ह्या विषयाचा माझा स्वतःचा स्वतंत्र, सखोल अभ्यास नसतांनाही

१३