पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सर्व सुधारणांची गुरुकिल्ली शिक्षण आहे. त्यामुळेच माणूस नव्या सुधारणा स्वीकारतो. तोच शिक्षणाचा मागास वर्गात प्रचारक बनतो, त्यामुळे शाळा दाराशी असूनही आता पीर ढोराशी ठेऊन चालणार नाही. हनुमंताला त्याची शक्ती ठाऊक नव्हती असे म्हणतात ती जांबुवताने जागविली. तशी नागरी माणसाची जबाबदारी आहे. आपला अहंगंड विसरुन त्यांच्यातल्या न्यूनगंडाला धक्का न लावता, आपण त्यांच्यात सोपे नसले, तरी समरस होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या झोपडीला दार नाहीत, तशी मनालाही नाहीत. त्यामुळे तेथे प्रवेश सुलभ आहे. मात्र शिक्षक म्हणून आदिवासी भागात कोणी जात नाही. शिक्षक म्हणून जाणे हे एक आव्हान आहे. म्हणून ध्येयवादी व्रती बनून ते पेलले पाहिजे. मनस्वास्थ्य गमावलेला माणूस आदिवासी भागात विशेष काही करू शकत नाही.

 आदिवासी भागात शिक्षकाच्या जागा, या ना त्या कारणाने रिकाम्या असतात. शाळांच्या सुट्ट्या आदिवासी जीवनाच्या संदर्भात दिल्या जात नाहीत. अभ्यासक्रमातही आदिवासी विद्यार्थ्यांची रुची वाढावी, असे फारसे नसते. अध्यापन साधन सामग्रीला मर्यादा असते आणि शिक्षक विद्यार्थ्यात अनियमितपणा असतो, यावर उपाय म्हणजे आदिवासी या भागात राहाणारे, रमणारे शिक्षक नेमावे. शिक्षणाचे माध्यम निदान इयत्ता १ ली ते ४ थी आदिवासी बोली असायला हरकत नाही. निवासी शाळा, भरपूर शैक्षणिक सवलती, उत्तेजनार्थ बक्षिसे, शिक्षकांना घरे, अधिक वेतन, शाळेची सोयीनुसार वेळ, स्थानिक सोयीनुसार आणि या शेती हंगामानुसार सुट्ट्या असाव्यात, प्रशिक्षित शिक्षक असावेत. हे असते तेथे आदिवासी विद्यार्थी जागा होऊन प्रसंगी नोकरीपेक्षाही शिक्षणाला महत्त्व देतांना दिसतो. निसर्गाच्या सान्निध्यात वावरत असल्यामुळे आदिवासी विद्यार्थी विज्ञानाच्या अभ्यासातही अधिक रस घेऊन प्रगती करील असे वाटते. मात्र त्यासाठी आदिवासींची नुसती पाहणी करुन भागणार नाही. त्यांच्यात प्रत्यक्ष व्यसनमुक्ती, शिक्षण प्रसार यासारख्या सुधारणा करण्याची गरज आहे.

 या गोष्टींचा समावेश झाल्यास नवे शैक्षणिक धोरण आदिवासींचा निश्चित

शैक्षणिक विकास साधू शकेल असे वाटते.

११८