पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांभाळत शिक्षणाचा खेळखंडोबा होणार नाही.
 ७. रेडिओ, टि.व्ही. चित्रपट इत्यादी दृकश्राव्य माध्यमे उपलब्ध करुन दिली पाहिजेत. अनिच्छेने का होईना कानावर चांगले पडेल, डोळ्यांना पाहावेसे वाटणारे दिसेल, संस्कार ग्रहण करावेच लागतील दुसऱ्याच्या कहाण्या आपल्या जीवनाला काही प्रमाणात हितावह ठरतील म्हणून चांगले चित्रपट दाखविले गेले पाहिजेत.
 ८. सर्वप्रकारच्या सुशिक्षणाबरोबरच संस्कारासाठी सांस्कृतिक कार्यक्रम त्यातील प्रशिक्षणासाह त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजेत. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये कलेची, संगीताची खेळाची, नीटनेटकेपणाची आवड आहे, ती जोपासली पाहिजे.
 ९. समाजाच्या आणि शासनाच्या मिळणाच्या मदतीब्रद्दल त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना जरुर आहे. चांगल्या शिक्षकाला, आपल्या हिताकडे लक्ष देणाऱ्या प्रशासकाला, जाणकार अधिकाऱ्याला ते न बोलताही मनोमनी फार मोठा मानसन्मान देत असतात. तो समजून घेऊन आणखी वाढेल कसा हे पाहिले पाहिजे.
 १०. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल्पवयातील मोलमजुरी, गुरे राखणे यासारखी कामे कायद्याने गुन्हा ठरवून बंद केली पाहिजेत, अशी मुले सापडली तर रिमांड होम नव्हे तर आश्रमशाळेत आणि वसतिगृहात दाखल केली पाहिजेत. बाल्याचा जर वाल्मिकी होऊ शकतो, गुरुविना जर एकट्याच्या हिंमतीवर शिष्य जर एकलव्य होऊ शकतो, हनुमानासारखा श्रेष्ठ रामभक्त होऊ शकतो. तर आदिवासी विद्यार्थी आपला सर्वांगीण उत्कर्ष साधू शकेल. यात शंका बाळगण्याचे कारण नाही. यातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाची नवी दिशा गवसण्याची शक्यता आहे.