पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नवे शैक्षणिक धोरण आणि आदिवासी विद्यार्थी विकास

 नवीन शैक्षणिक धोरणांचा मसुदा तयार झाला तेव्हा त्यासंदर्भात आकाशवाणीवरुन बोलतांना या खात्याचे केंद्रीय मंत्री त्यानंतर पंतप्रधानपद भूषविणारे श्री. पी. व्ही. नरसिंहराव यांनी सांगितले होते की आदिवासींचा विकास झाला पाहिजे. सर्वसामान्य माणसांबरोबर येण्याकरिता विविध सुविधा ह्या आदिवासी पर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यातच शिक्षण सुविधांचाही समावेश होतो.

 स्वातंत्र्यानंतर गेल्या ३८ वर्षात आदिवासींसाठी पुष्कळ काही केले. तरी अद्यापही बरेच काही करावयाचे बाकी आहे. आदिवासींचा खऱ्या अर्थाने विकास व्हावयाचा असेल तर शिक्षण हा एकमेल रामबाण उपाय आहे. पंतप्रधानांना असाच सर्वांचा विकास नव्या शैक्षणिक धोरणात अभिप्रेत होता. त्यासाठी स्वतःशी व कामाशी प्रामाणिक राहून योजनांची अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते शिक्षण क्षेत्रातही निर्माण होण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शिक्षणाचे केंद्र बनलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी काही सूचना करून त्यावर उपायही सुचविलेले आहेत.

 आदिवासी विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाच्या योजनांच्या संदर्भात जेव्हा आपण त्याचा विचार करतो. तेव्हा तो आदिवासी विद्यार्थी जगाच्या खूप मागे आहे हे आपल्या लक्षात येते. शहरातील विद्यार्थ्यात सुखसुविधांच्या मानाने त्याची खूपच पीछेहाट आहे. शैक्षणिक साधनसंपत्ती आणि वातावरणापासून तो वंचित आहे.

 आजच्या काळातही प्राचार्यांच्या कार्यालयात भीत भीत चपला बाहेर काढून प्रवेश करणारा आदिवासी विद्यार्थी दिसून येतो. म्हणजे अशा खरी संस्कृती जपणाच्या विद्यार्थ्यांसाठी समाजात राम, नारद, आणि द्रोणाचार्य संचारले पाहिजेत असे वाटते. म्हणजे त्यांच्याप्रेरणेने या वनवासातून संचोटीचे एकनिष्ठ भक्त हनुमान, बाल्मिकी आणि एकलव्य घडतील याची खात्री वाटते.