पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्कार करावयाचे त्याच ठिकाणी या बालमनांना पावलोपावली घट्ट करकोचे पडावे अशी स्थिती आहे. शासनाचा मूळ हेतू सफल होत नाही. केवळ कार्यकर्त्यांना, परिस्थितीला नावे ठेवून चालणार नाही. त्यातून भार्ग हा काढलाच पाहिजे. अधीक्षक, हाऊसमास्टर, रेक्टर, पर्यवेक्षक अशी कामे स्वीकारणाऱ्यांनी बालमानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र जाणून घेतलेच पाहिजे. युवकाची मने आणि आकांक्षा समजावून घेऊन वागले पाहिजे. आपले अपुरे पगार कुटुंबपासून दूर एकटं राहणे, सवलतींमुळे विद्यार्थी जीवनाचा विद्यार्थ्यांना पडणारा विसर सगळे असूनही तळमळीने मुलांसाठी काम केले पाहीजे. आपल्या व्यथा मुलांचे माथी मारून चालणार नाही. तर त्यांना समजावून घेऊन सगळ्या चुकाही पोटात घालून सामोपचारानेच मार्ग काढला पाहिजे. समाजातील आदर्शाच्या ढासळण्याने विद्यार्थीही काही प्रमाणात ढळणार हे गृहीत धरूनच गृहप्रमुखाने वागावे, आदिवासी -भागात उलट जास्तीत जास्त अर्हता प्राप्त माणसांची विशेष गरज आहे, आणि नेमकी उत्तम गुणवत्ताप्राप्त माणसे महात्मा गांधीनी खेड्याकडे चला सांगूनही जायला तयार नाहीत. केवळ जेवणाचे हिशोब ठेवणाच्या वसतिगृहप्रमुखापेक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनाचे हिशोब मांडणारे हाऊसमास्टर्स पाहिजेत.
 ४. एकशिक्षकी शाळा हा तर या भागात अन्याय आहे. एकच शिक्षक चार वर्ग सांभाळतो त्यात कुटुंबनियोजनाच्या केसेस मिळविण्याची जबाबदारी, मग मुलांचे व्हायचे कसे ? शक्यतो विषयतज्ज्ञ सत्पात्र शिक्षक नेमून त्यांना उत्तम निवास व्यवस्था उपलब्ध करून सार्वजनिक बांधकाम खात्यामधील कर्मचाऱ्यांना धरणांवरील कामी नियुक्ती केल्यावर जसा साईट अलाऊन्स मिळतो. तसा पगा विशेष चांगला लाभांश मिळावा यामुळे चांगले शिक्षक आकर्षित होतील, मन लावून कामे करतील.
 ५. दारुबंदी प्रकार प्रत्यक्षात आदिवासी वस्त्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचला पाहिजे. तसा तो पोहोचत नाही. उलट घरात हातभट्ट्या चालतात असे कळते. दारू गाळली जाते, असे म्हणतात. यातले सत्यासत्य जाणण्यापेक्षा वेळीच ते थांबविले पाहिजे. पाड्यापर्यंत पोहोचणे खेड्यापेक्षाही महत्त्वाचे आहे. दारुबंदी प्रचार तेथवर पोहोचला नाही तरी निदान पोहोचलेली दारू काढून घेतली पाहिजे. काळ्या गुळाची विक्री बंद करावी.

 ६. मर्यादित कुटुंब राखण्यात कल्याण आहे. म्हणजे धाकट्या भावंडांना

१०८