पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपला बहुतेक वेळ घालवितात.” बऱ्याच उदाहरणांवरून आपणांस असें आढळून येतें कीं, "तारुण्याच्या धुंदीत केलेल्या गोष्टींबद्दल मातारपणीं गात्रे शिथिल झालीं ह्मणजे मनुष्यास पश्चात्ताप करीत पडावें लागतें.” “जें एकदां होऊन चुकलें तें क्लॉथो देवीला देखील आपल्या दैवरूपी जाळ्यांत पुनः गोंवितां येत नाहीं किंवा ॲट्रोपा देवीला परत आणितां येत नाहीं. मनुष्याला स्वतः- बद्दल फाजील काळजी असते पण ती शहाणपणानें नियमित झालेली नसते.”

 “ तुह्मी इष्टवादी आहांत" हा आरोप मजवर कधीं कधीं आणितात. पण आरोप आणणाऱ्या लोकांनीं पक्के ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, ह्या भवसागरांत संकटें व दुःखें नाहीं तच किंवा तीं क्षुल्लक आहेत असें मीं हाटलें नाहीं, माणसें सुखी आहेत असेंही मी कधीं ह्मणालों नाहीं. मात्र सर्व माणसांना सुखी रहातां येईल असें माझें मत आहे. तसेंच माणसांना सुख जें मिळत नाहीं तें त्यांच्याच अपराधामुळे. आपणांपैकीं बरींच माणसें फक्त थोड्याच सुखांचा अनुभव घेतात; व त्यांपेक्षां जास्त सुखांचा ते अव्हेर करितात असेंही माझें मत आहे; व ह्यामुळेंच मनुष्यप्राण्याला सुख मिळत नाहीं ही गोष्ट अधिक वाईट वाटते. “जिव्हेनें उच्चारलेल्या व लेखणीनें लिहिलेल्या औदासिन्यप्रदर्शक सर्व उद्गारांपेक्षां ‘असें झालें असतें' हा उद्गार फारच दुःखप्रद होय. "

 पुष्कळ ठिकाणीं ज्याला आपण दुःख ह्मणतों तें खरोखरी सुख असून त्याचा वाईट रीतीनें उपयोग केल्यामुळें किंवा अतिरेक झाल्यामुळे दुःखाप्रमाणें वाईट वाटू लागलेलें असतें. यंत्रांतील एकच चक्र किंवा एकच खिळा जर निखळला तर सर्व यंत्र बंद पडतें. त्याचप्रमाणें सृष्टीच्या प्रकृतिनियमांशीं विरोधभावानें आपलें


१. लिली. २. लूशन ३. व्हिक्टर.