पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२

दारूबाजी हा दुर्गुण मुख्यत्वेंकरून शीतदेशांतला होय. तरी सालोमननें त्याचा निषेध केलेला आहेच.
 कोणांवर संकटें येतात ? तंटेबखेडे होणें, असंबद्ध बडबड करणें, निष्कारण जखमा होणें, डोळे लाल असणें, इत्यादि प्रसंग कोणांवर गुदरतात ? जे दारू झोंकित बसतात त्यांच्यावर; ज्यांना भेळसेळ दारू पाहिजे त्यांच्यावर. दारू भांड्यांत लाल जर्द दिसते तेव्हांच तिचा रंग पाहून आनंद मानूं नकोस. अंतीं ती नागिणीसारखी डसते, व सर्पासारखी दंश करिते.
 दारूबाजीचा दुर्गुण दिवसेंदिवस कमी होत चालला आहे असें मानण्यास थोडासा आधार आहे. बुद्धीचें काम करण्यास जसजशी जास्त संधि मिळू लागली, गायन जसजसे जास्त उपलब्ध होऊं लागलें, चित्रे, पुस्तकें हीं जसजशी मिळू लागलीं, तसतशीं मान राखून राहणारी सुखवस्तू लोकांचीं घराणीं दारू पिण्याच्या नेमस्तपणास उत्तेजन देऊं लागली आहेत.
 परंतु ज्याप्रमाणें मद्यापासून होणारीं अनिष्टें अधिकाधिक स्पष्ट होऊं लागलीं आहेत, त्याप्रमाणेंच अधाशीपणे खाण्यापासून होणारीं अनिष्टें देखील उघड होऊं लागली आहेत. प्रत्येक दहा माणसीं नऊ आहारापलीकडे व प्रकृतीस मानेल त्यापेक्षा जास्त अन्न खातात. मधून मधून एकादी मेजवानी केल्यास वावगें नाहीं. पण रोजरोज जें नियमानें आकंठ खाणें तें अपायकारक होतें; व त्यापासून मांद्य येतें. आहाराबाहेर खाणें फार सोपें आहे. आणि माणूस पोटास हवें त्यापेक्षां कमी खाईल अशी भीतीच नको.
 मिताहार आयुष्यभर ठेवावा. वस्तुतः मिताहार ज्ञानरूपी व उत्साहरूपी सुवर्णास शुद्ध करितो; दोघांची किंमत दसपट करितो;


१ प्रॉव्हर्न्स.