पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६१

 हे आयुष्य आपण सुखावह करून घेतलें नाहीं तर अप- राध आपलाच. रस्किन ह्मणतो — “सर्वोस आयुष्यांत सुख मिळवितां येईल; मात्र थोड्यांनाच एकादें मोठें कृत्य क रितां येईल.”
 आरबी भाषेतल्या सुरस गोष्टींतील सर्वात उत्तम भारलेला पदार्थ ह्मणजे जादूची सतरंजी होय. तीवर मनुष्य बसला ह्मणजे वाटेल तेथें त्यास जातां येई. सांप्रत रेल्वेनें आपणां सर्वास तसें करितां येतें; व "ज्या मानानें दृश्य पदार्थांचा टप्पा वाढत जातो, त्या मानानें आपल्या कल्पनाशक्तीची धांव वाढत जाते'."
 आणखी ह्या जगांतील सुखांमध्ये चांगल्या संभाषणास उच्च- पद द्यावेंसें मला वाटतें. तें एक उद्दीपक द्रव्यच असून शरीर व मन ह्या दोहोंसही पुष्टिकारक होतें. बेनजान्सनपासून आपला बराच फायदा झाला हे हेरिक आपल्या चटकदार भाषेत कबूल करितो, व आपल्या भोजनसमारंभाचें असें वर्णन करितो- जेव्हां आह्मी एकत्र जमत असूं व परस्परांवरील प्रेमाति- रेकानें केवळ वेडे न होतां स्वतःस विसरत असूं, तेव्हां देखील तुझी प्रत्येक कविता मांसाहारापेक्षां व निशा आणणाऱ्या मद्या- पेक्षां अधिक गोड वाटे.
 संध्याकाळचा वेळ आनंदांत गेला असें सांगावयाचें असलें कीं, "महाराज, आह्मी सुरेख गोष्टी करीत होतों” असें जॉनसन ह्मणे. डार्विन, लायल, किंग्स्ले, रस्किन, हूकर, हक्स्ले, अथवा टिंडल, ह्यांच्या संगतींत घालविलेला एकाददुसरा तास स्वच्छ हवेच्या झुळकेप्रमाणे मला वारंवार ताजातवाना करितो.


१ रस्किन.