पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाहीं; व व्यावहारिक बाबतींत बहुतां ठिकाणीं आह्मांस अपयश येतें, व राष्ट्राला इतर राष्ट्रांशीं समतेनें वागतां येत नाहीं. उस्क्रान्तीच्या नियमाप्रमाणें प्रवृत्ति विशेष पाहिजे असली, तर उत्कृष्टतमाची सरशी व्हावी ह्या न्यायानें पाश्चात्यांचा सर्व बाबतींत जय आहे तो सारखा चालत जाईल. राष्ट्रीय दृष्ट्या वृत् आह्मांस विशेष हवी किंवा निवृत्ति हवी, राष्ट्र बलाढ्य धनाढ्य व्हावें किंवा नुस्ती आध्यात्मिक उन्नति पुरे आहे इत्यादि प्रश्नांचा मला निकाल लागला नाहीं, सद्गुरुप्रसादाने जेव्हां लागेल तेव्हां लागेल, सध्यां मात्र त्यांचें द्वंद्व माझ्या मनांत चाललेलें असतें; व कदाचित् माझ्या सारख्या इतर अज्ञांच्या मनांत चाललें असेल. त्याचा निकाल लावावयास राष्ट्र तयार झालें ह्मणजे लागेलच, पण त्याची तयारी ह्मणून हा ग्रंथ भाषांतररूपानें सुज्ञांपुढें मांडिला आहे. ह्या ग्रंथांत पाश्चात्यांची संसाराबद्दलची कल्पना स्पष्ट- पणें व्यक्त होते, व त्यांच्या मोठमोठ्या लोकांचे विचारही सांप- डतात. ह्या कल्पनेशीं आपली कल्पना ताडून पाहून राष्ट्राच्या उन्नतीस कोणती विशेष जरूरीची आहे हें ठरविणें सोपें पडेल.

 हा ग्रंथ भाषांतर करण्याची परवानगी लबक साहेबांकडून १८९६ च्या सुमारास आणविली होती. पण, अभ्यास, दुखरे डोळे, इतर व्यवसाय इत्यादींमुळे भाषांतर करण्याचें काम बरेंच लांबणीवर पडलें. होतां होईल तों भाषांतर पराठी शब्द घालून करण्याचा यत्न केला आहे. कांहीं ठिकाणीं निरुपायास्तव संस्कृत शब्द घालणें भाग पडलें. कांहीं ठिकाणीं भाषांतर चांगलें वठलें नाहीं, हें माझें मला कळतें आहे. पण, माझ्या हातून जितकें चांगलें झालें तितकें मीं केलें आहे. मूळ ग्रंथांत आलेले कवीचे उतारे गद्यांत उतरविले आहेत. एक तर कविता करण्याची शक्ति ईशाच्या अवकृपेनें माझ्या ठिकाणीं नाहीं. आणखी कविता कर-