पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०

 एडवर्ड कोर्टनेचा अर्ल ऑफ डेव्हन शिअरच्या कबरीवरील प्रसिद्ध लेख पुढें लिहिलेला होय.
 “जें आपण दान दिलें तें आपलें होय. जें आपण खर्चिलें तें आपलें होतें. जें आपण मागें ठेविलें तें फुकट गेलें. "
 हेंच निराळ्या रीतीनें पुढील वचनांत सांगितलें आहे:-
 मीं जें शिल्लकेस टाकिलें तें फुकट गेलें. मीं जें खर्चिलें तें भोगून चुकलों. मीं जें दान केलें तें अद्यापि मजजवळ आहे.
 मन उदार असूं द्या; तरी पण उधळपट्टी करूं नका.
 पुष्कळ पैसा जमवूनही भिकारीं अशीं कांहीं माणसें आहेत, व स्वतःला गरीबी आणूनही श्रीमंत अशीं देखील कांहीं आहेत.
 जो गोरगरीबांवर दया करितो तो ईश्वराला ऋणी करितो. कारण,ज्यानें लोकांला दिलें त्याला ईश्वर देईल.
 ख्रिस्तानें श्रीमंत तरुणाला केलेला उपदेश त्याच माणसाला लागून होता असें ह्मटलें तरी चालेल. कारण, आपणांला आपल्या मुलांबाळांकडेही पाहिले पाहिजे व गरीबांकडेही पाहिले पाहिजे. स्वतः कमावलेली मिळकत तुमची खुद्द; पण वाडवडिलांकडून आलेली मिळकत तुमची खुद्द नव्हे. ज्यांच्या जवळ पैसा ते ईश्वराचे दास. बैबलांतील दृष्टांतरूप कथेंत सांगितल्याप्रमाणें त्यांच्या जवळ पैसा ठेवीदाखल ठेविलेला आहे; त्यांना त्याबद्दल हिशेब द्यावा लागेल; व हें एक मोठें जोखमाचें काम त्यांच्यावर सोंपविलेलें आहे. जीबद्दल गर्व वहावा असली वस्तु पैसा नव्हे.
 "ह्या जगांत जे श्रीमंत आहेत त्यांना अशी आज्ञा सांगा कीं, तुझी पैशाबद्दल गर्व करूं नका, नश्वर वित्तावर फारसा विश्वास ठेवूं नका, फक्त जागृत ईश्वरावर विश्वास ठेवा. तो उपभोगाच्या सर्व वस्तु अघळपघळ देतो.”<br.


१ प्रॉव्हर्ब्स.