पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८

,

आपला नाहक छळ होतो असें नेहमी वाटतें. जेवढे देण्याची तुमची ऐपत असेल तेवढे मोठ्या मनानें द्या. पण तें परत मिळण्याची आशा करूं नका.
 आरंभीं पैसा थोडा मिळतो ह्मणून धैर्य खचूं देऊं नका. पैसा मिळण्याचा रस्ता लांब आहे, परंतु त्याला वळणें नाहींत. यदा- कदाचित् पैसा पहिल्यानें पुष्कळ येऊ लागला तरी तो सर्व खर्चू नका. तर अडचणीच्या प्रसंगासाठीं तो थोडा राखून ठेवा. हे ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, ज्याप्रमाणें वाईट मार्गाला वळणें असतात, त्याप्रमाणें चांगल्या मार्गालाही असतात. व जसजसे तुह्मी मोठे व्हाल, तसतशीं तुमच्या पिशवीला जास्त छिद्रे पडूं लागतील. व्यापारधंद्यांतले पुष्कळ लोक आरंभी बरेंच यश आल्यामुळे धुळीस मिळाले आहेत.
 श्रीमंत होण्याची घाई करूं नका. रस्कीन ह्मणतो- "जर केवळ बाजारभावावर चित्राची किंमत ठरवू दिली नाहीं, तर कांहीं वेळानें चित्रास वाटेल ती किंमत येईल."
 पैशाविषयीं विशेष फिकिरीत असूं नका. श्रीमंत होण्याची आशा जरी थोड्यांनाच असते, तरी उद्योगानें व काटकसरीनें कोणालाही पोटापुरतें मिळवितां येईल. पैसा प्रामाणिकपणानें न मिळविल्याचीं उदाहरणें नेहमीं आपल्या ऐकिवांत असतात; परंतु वस्तुतः गरीबी देखील आपल्या हातीं नाहीं अशा कारणांनी क्वचितच येते. ज्याच्याजवळ थोडें तो गरीब नव्हे, तर ज्याच्या वासना जास्त तो गरीब.
 सर जेम्स पेजटनें आपल्या मनोरंजक व्याख्यानांत स्वतःच्या शिष्यवर्गाविषयीं आंकडे दिले आहेत. त्यांच्या आयुष्यक्रमाचा त्यानें नीट तलासा ठेविला होता. प्रत्येक हजारी दोनशांनी उद्यो-