पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२


 झटलें आहे कीं, ज्यांना धीर असतो त्यांना सर्व कांहीं साध्य होतें. तर वाहत्या गंगेंत हात धुऊन घ्या. एकादी गोष्ट करितां येते तेव्हां जो ती गोष्ट करीत नाहीं, त्याला जरूर असेल तेव्हां ती गोष्ट करितां येणार नाहीं. एकदां संधि फुकट घालविली तर ती पुनः कधीं येणार नाहीं.
 "माणसाच्या कामाकाजाचाही भरतीसारखा वेळ असतो. त्या भरतीचा उपयोग केला तर दैव उघडतें. जर ती फुकट घालविली तर ह्या संसारांतला सर्व प्रवास दुःखकारक व दुर्गम होतो. अ सल्या भर समुद्रांत आपण आहोत, आणि ह्मणून प्रवाहाचा उप- योग करून घेतला तर बरें; नाहीं तर, आपल्या कार्यात अपयश येणारच.”
 सावधगिरीनें वागा, पण संशयी असूं नका. हातून चूक होईल त्याची विशेषशी काळजी बाळगूं नका. ज्याच्या हातून कधीं चूक झाली नाहीं, त्याच्या हातून कांहींच व्हावयाचें नाहीं. नेहमीं चांगला पोषाख करा. पोषाख करणें जरूर आहे; ह्मणून तो चां- गला करावा, पण भपकेदार नसावा. तो करण्यांत व्यर्थ पैसा खर्चू नये, व वेळ मोडूं नये; पण कापड चांगले वापरण्याची काळजी घ्यावी. पोषाखावरून माणसाची किंमत लोक किती करितात हे पाहून आश्चर्य वाटतें. ज्यांशीं ज्यांशीं तुमचा संसर्ग होतो, ते ते लोक बहुतकरून प्रत्येक माणसाची बाह्यस्वरूपावरून किंमत करणार; व पुष्कळ माणसांना तुमची किंमत करण्यास बाह्यस्वरूपाशिवाय दुसरें साधन नसतें. डोळे व कान ह्यांच्या साहाय्यानें अंतरंग लोकांना कळतें. शंभर लोक तुझांला भेटले तर एकादा मनुष्य तुझांला ओळखील. तशांत स्वतःबद्दल निष्का- ळजीपणानें वागत असलां, व तुमची ठाकठीक नसली, तर तुझी


१ शेक्सपियर.