पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०


  " जे लोकांवर विश्वास ठेवितात ते, जे विश्वास ठेवित नाहींत अशा लोकांपेक्षां, जास्त अंशीं बरोबर असतात."
 विश्वास ठेवणें तो पूर्णपणें ठेवावा, पण तो फसेपर्यंत नसावा. " विश्वास ठेवावयाचा तर सर्वस्वी ठेव नाहींतर ठेवूं नकोस" असें व्हिवियनचें भाषण मूर्खपणें खरें मानून मर्लिन शहाणा होता तरी मेला.
 दूरवरचा विचार करून वागा, व आपले विचार आपले जवळ ठेवा; तुमचे विचार तुह्मांला मनांत ठेवितां आले नाहींत, तर लोक ठेवितील असें समजूं नका. शहाण्या माणसाचें तोंड त्याच्या हृदयांत असतें, पण मूर्खाचें अंतःकरण त्याच्या तोंडांत असतें, कारण, जें जें त्याला कळतें व वाटतें तें तें तो बोलून दाखवितो.
 डोकें खर्चा, व आपल्या बुद्धीची सल्ला घ्या. बुद्धीमुळें चूक होणार नाहीं असें नाहीं. पण तिची सल्ला घेतली असतां चूक घडण्याचा संभव कमी असतो.
 बोलणें रुप्यासारखें दीपविणारें असतें, निदान असावें; पण चुप रहाणें हें सोन्याच्या किंमतीचें आहे.
बोलावयाजोगें पुष्कळ आहे ह्मणून बरेच लोक बोलतात असें नव्हे, तर त्यांना बोलणें आवडतें ह्मणून बोलतात इतकेंच. बोलणें डोक्याचें काम असावें, जिव्हेचें नसावें. ह्मणजे बोलणें विचारपरिप्लुत असावें, नुसती वटवट नसावी. चघळपणा किंवा बोलण्याची फार हौस ह्यामुळे जगांत वर येण्यास आडकाठी येते. बोलण्याच्या भरांत माणसांस भान रहात नाहीं. मनांत बोलाव- याचें असतें त्यापेक्षां निराळेंच बोलून जातात; व नंतर बोललों नसतों तर बरें झालें असतें असें त्यांना वाटतें. अथवा बोल- ण्याच्या नादांत जिव्हेस कांहीं काम पाहिजे ह्मणूनच की काय, दुसरें तिसरें कारण नसतां माणसें अयोग्य गोष्ट बोलून जातात.