पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२

विषाद न बाळगितां एकाद्या गोष्टीस होकार देण्याचें सर्वानाच साधत नसतें; पण नकार देणें त्याहीपेक्षां कठीण आहे. नाहीं ह्मणण्यापुर्ती भीड मोडत नाहीं ह्मणून किती लोकांचें मातेरें झालें आहे ? प्लयूतार्क ह्मणतो, एशिया मायनरचे लोक परागंदा झाले ह्याचें कारण एकच होय; तें हैं – त्यांना "नाहीं" हीं दोन अक्षरें बोलतां आलीं नाहींत. ह्या संसारांत नाहीं ह्मणण्याची आवश्यकता आहे असें ठरलें, तर तो शब्द लोकांचीं मनें न दुखवितां बोलतां येणें हें कमी जरूरीचें आहे असें नाहीं. ज्याशीं ह्मणून आपणांस व्यवहार करावयाचा असेल त्याला तो आपल्याशीं करणें गोड वाटेल, व एक संपल्यावर दुसरा करण्यास यावें अशी इच्छा होईल, अशा रीतीनें वागण्याची खबरदारी आपण ठेविली पाहिजे. पुष्कळांस वाटतें त्यापेक्षां पैशाच्या व्यवहारांत मानापमानाचें व आवडीनावडीचें गोंवें जास्त असतें. आपणाशीं लोकांनीं ममतेनें व सभ्यपणानें वागावें असें प्रत्येकाला वाटतें. ह्मणून अर्धा टक्का अधिक देऊन जें काम होतें, त्यापेक्षां गोड शब्दांनीं व सरळपणानें तें जास्त लवकर होतें.

 मनांत असल्यास प्रत्येक माणसाला गोड शब्द वापरतां येतील. “लोकांना खुष करण्याच्या नुसत्या इच्छेच्या योगानें, ती युक्ति जवळ असून जो फायदा होतो, त्याच्या निम्मेनें तरी होतो.” त्याचप्रमाणें ज्यांची इतरांस खुष करण्याची इच्छा नाहीं, त्यांच्या हातून तें काम व्हावयाचेंच नाहीं. तरुणपणांत जर ही मोठी देणगी तुझीं संपादिली नाहीं, तर मोठेपणीं ती संपादणें अधिक जड जाईल. आंगच्या खऱ्या गुणांपेक्षां फक्त सालसपणामुळे पुष्कळ माणसांचें ऐहिक कल्याण झालेलें आहे. खरोखर पूजार्ह, दयालु, व परोपकारी माणसांना बेपर्वाई वर्तनामुळें पुष्कळ शत्रु


 १ चेस्टरफील्डची पत्रे.