पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८

 व्हावेनारगूस ह्मणतो — “संपत्ति, मानमरातब, मोठमोठे हुद्दे इ० मिळणें माणसाच्या हातीं नसतें; पण उदार, शहाणें, व चांगलें होणें हें प्रत्येकाच्या हातीं असतें. " आपणांजवळ जें वित्त असतें ती आपली खरी संपत्ति नव्हे; आपल्या अंगीं जें कांहीं असतें ती आपली खरी संपत्ति होय. आपणांस इतर माणसांपेक्षां ज्या जास्त सवलती असतात, त्यांचा मोबदला ह्मणून आपल्या शिरावर त्या मानानें जास्त जोखीमही असतें. क्रायसोस्तम साधू ह्मणतो — “ हा संसार रंगभूमीवर आणलेल्या नाटकाप्रमाणें आहे; व माणसांचें काम पात्रांच्या कामाप्रमाणें आहे. संपत्ति, आपत्ति, राजे, प्रजा व ह्यांसारख्या इतर गोष्टी नाटकांत दाखविलेले अंक होत. जेव्हां हा संसार आटपेल, तेव्हां हें नाटकगृह बंद होईल; व सोंगांचे पोषाख उतरवून ठेवावे लागतील. नंतर प्रत्येकाची त्याच्या कर्मासकट तपासणी होईल. तेव्हां त्याच्या संपत्तीचा, त्याच्या हुद्याचा, त्याच्या अधिकाराचा विचार व्हावयाचा नाहीं; तेव्हां फक्त त्याच्या कर्माचा विचार होईल. आपलें कर्म कसोटीस उतरेल अशी आपण आशा करूं या."

 आतां आपलें कर्म कसून पाहण्याची सहाण कोठली ? आपण किती गोष्टी केल्या हें आपल्या कर्माचें माप नव्हे, तर किती गोष्टी करण्याचा यत्न केला हें माप होय. आपण ह्या जगांत नांव मिळविलें किंवा नाहीं हें खरें माप नव्हे, तर नांव मिळविण्यास आपण खरे लायक होतों कीं काय ? “ज्याला दुसऱ्याच्या मर्जीवर अवलंबून रहावें लागत नाहीं, ज्याचें रक्षणाचें कवच ह्मणजे शुद्ध विचार, ज्याचें चातुर्य ह्मणजे खरें सांगण्याची इच्छा, त्याचा जन्म किती सुखाचा ! त्याचें किती चांगलें शिक्षण !” वास्तविक पाहिलें तर खरें सुखी आयुष्य ह्मणजे शहाणपणानें


१. वाटन.