पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३५


 एपिक्टेटस ह्मणे - "झ्यूसनें ठरवून ठेवल्याप्रमाणें वागा. जर वागलां नाहींत, तर तुह्मांला दंड द्यावा लागेल व शिक्षा भोगावी लागेल; व ही शिक्षा कोणती ? कर्तव्य न करणें हीच शिक्षा. विनय, सचोटी, योग्य वर्तन ह्याबद्दलचें तुमचें नांव जाईल. ह्या- शिवाय आणखी कोणता दंड हवा ?"
 रस्किन ह्मणतो- "पुष्कळ गोष्टींची उणीव आहे अशी आपली कुरकुर असते. आपणांस मत देण्याचा अधिकार पाहिजे, आपणांस स्वातंत्र्य पाहिजे, करमणुकीच्या गोष्टी हव्या, पैसा हवा, परंतु आपणांस स्वास्थ्य पाहिजे आहे असें कोणास बरें कळतें व त्याची उणीव कोणास बरें भासते ? पण तें पाहिजे असेल, तर तें दोन मार्गांनीं मिळतें. पहिला मार्ग तुमच्या हातीं आहे. गोड विचारांचें पटल आपल्या भोंवतीं ठेवणें तुमच्या हातीं आहे- सुंदर विचारांची किती सुरेख मनोराज्यें करून ठेवतां येतील हैं। अद्याप कोणालाही कळत नाहीं. कारण लहानपणीं हें आपणांस शिकविलेलें नसतें. हीं मनोराज्यें किती विपत्ति आली तरी टिकतात. आनंदजनक कल्पना, समाधानाच्या गोष्टींची आठवण, उदात्त ऐतिहासिक गोष्टी, खऱ्या ह्मणी, मौल्यवान् व शांततामूलक अशा विचारांचीं भांडारें, इत्यादि गोष्टींना काळजीमुळे व्यत्यय होत नाहीं; त्या दुःखांमुळें कंटाळवाण्या वाटत नाहींत, व गरीबी आपणाकडून हिरावून नेत नाहीं. हीं मनुष्यांच्या हस्तस्पर्शा- वांचून बांधिलेलीं स्थानें व गृहें होत व तीं आपल्या आत्म्याला रहाण्याकरितां आहेत."
 चांगला व मोठा बादशहा अन्टोनिअस ह्यानें मरतेवेळीं पाह- ऱ्यावरील अधिकाऱ्याला खुणेचा शब्द ह्मणून "शांतता" हा सांगितला. ख्रिस्ताच्या आयुष्यांतील शांततेचा कशानेंही मोड झाला नाहीं.