पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६

शोकपर्यवसायी वाटतो " असें वॉलपोलनें संसाराचें वर्णन केलें आहे. पुष्कळदा संसार आनंदमय वाटतो. बऱ्याच वेळीं तो शोकमय वाटतो. परंतु संसार आपणांस वाटेल तसा मानितां येईल, असा साधारण नियम आहे. सॉक्रेतीस असें ह्मणतो —“ चांगल्या माणसास, ह्या संसारांत जिवंतपणीं काय, व मेल्यावर काय, कोणतें ही दुःख नाहीं. ” आणि खरोखर संसार शोकपूर्ण आहे असें सांगत फिरणाऱ्या विद्वानांपेक्षां तो आनंदमय आहे असें सांगणाऱ्या लोकांचें ह्मणणें अधिक खरें ठरतें. आपणांस दुःखाचा व शोकाचा एकेक क्षण मोजण्याची संवय आहे. पण सुखांत घालविलेलीं वर्षांची वर्षे मोजतांना गाळण्याचा संभव आहे.

 आपणांस नेहमीं यश येईल असें वाटतां कामा नये. सृष्टीचे नियम कधीं कधीं व्यर्थ होतात. पण “ज्वानीच्या भरानें व लक्ष्मीच्या मदानें आपण फुगूं नये, किंवा पडता काळ आला ह्मणून बऱ्याबद्दल निराश होऊ नये." बैबलमधील सर्वास माहीत असलेल्या भागांत असें सांगितलें आहे - "मनुष्यास नाशाप्रत नेणारा रस्ता मोठा आहे, व त्याचा दरवाजाही मोठा आहे. व त्या रस्त्यानें जाणारे लोकही पुष्कळ आहेत; कारण सदाचरणाचा रस्ता फार अरुंद असून त्याची देवडी लहान आहे, व तेथें जाणारे लोकही थोडे आहेत. "

 परंतु लोक ह्या उताऱ्याचा वारंवार भलताच अर्थ करितात. सदाचरणाचा खरा रस्ता विकट व संकटमय आहे, असा ह्या उताऱ्याचा अर्थ नव्हे. त्याचा इतकाच अर्थ कीं, तो लहान आहे व सहज मिळण्याजोगा नाहीं. हा खरा रस्ता एकच आहे. पण त्यापासून दोन्ही बाजूंस फुटणारीं बरींच वळणें आहेत. समु- द्रांतून प्रवास करणाऱ्या गलबतास एकच खरा रस्ता असतो.


 १ बोइथिअसचें आल्फ्रेड राजाने केलेले भाषांतर.