पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५

जगांत घडणाऱ्या गोष्टींबद्दल वाईटही वाटतें. परंतु ज्यानें जगांत येऊन कर्तव्यकर्म बजाविलें, अशा कोणत्याही माणसाला जगाचा कंटाळा येत नाहीं."

“ ईश्वर दयालु आहे अशी ज्याची अनुभूति, त्यालाच ह्या संसाराचें गुह्य उमजलें. " सेनिका ह्मणतो-“ जें केल्यापासून आपणांस सुख होत नाहीं असें कोणतेंही कर्तव्यकर्म नाहीं; किंवा ज्याचा प्रतिकार करितां येत नाहीं असा एकही मोह नाहीं." मिल्टन ह्मणतो — "सृष्टीला दोष देऊ नकोस, तिनें आपलें काम बजाविलें आहे; आतां तूं आपलें काम कर." ह्या सृष्ट पदार्थांचा आपण पूर्णपणे उपभोग घ्यावा अशी जर ईश्वराची मर्जी नसती, तर त्यानें सृष्ट पदार्थ डोळ्यांला सुंदर वाटण्याजोगे व कानांला गोड लागण्याजोगे कां उत्पन्न केले असते ? त्याचप्रमाणें सन्मार्गानें चालून मनुष्य जें सुख मिळवितो, व इतर लोकांस जें स्वास्थ्य देतो, त्याची किंमत करणें अशक्य आहे.

 माझ्या मतें, होऊन गेलेल्या सर्व युगांत सध्यांचें युग पुष्कळ अंशीं आश्चर्यजनक, लोकांना मनोरंजक वाटणारें, व शिक्षित दशेस आलेलें आहे असें जर झटलें, तर तें केवळ आपल्या नशिबानें झालेलें आहे; स्वतःच्या मेहनतीमुळे नव्हे. ह्मणून त्याबद्दल आपणांस डौल मिरवावयास नको. त्याबद्दल आपण ईश्वराचे आभारी असलें पाहिजे.

 त्याबद्दल आपण कृतज्ञ असावें, व जगांत सुखोपभोगाच्या ज्या असंख्य गोष्टी आहेत त्यांचा पूर्णपणें आस्वाद घ्यावा. तथापि आपणांवर दुःखें येऊ नयेत, किंवा आपणांस कशाची काळजी नसावी, ही आशा मनांत वागवितां कामा नये. “विचारी माणसांस हा संसार आनंदमय वाटतो, व विकारबद्ध लोकांस तो


१ साउधी. २ व्हिटिअर.