पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४

तीं घटकाभर एकीकडेस ठेविलीं तरी हें आयुष्य इतकें घोंटाळ्याचें आहे, हें जग अजून इतक्या तारुण्यावस्थेत आहे, आपल्या जीवितास किती गोष्टी आवश्यक आहेत ह्याबद्दल आपणांस इतकी थोडी माहिती आहे, त्याचप्रमाणें आपल्या सभोंवार पसरलेल्या पदार्थांचें, त्यांच्या गुणावगुणांचें, व धर्माचें आपणांस इतकें कमी ज्ञान आहे कीं, पुष्कळ दुःखें व संकटें गुदरणार हे आपणांस लक्षांत ठेविलें पाहिजे. परंतु विपत्तीनें भरलेल्या असल्याच रस्त्यानें स्वर्गास जातां येतें, ह्मणून येथें आयुष्य जर आनंदांत काढिलें तर परलोकीं आपणांस दुःख भोगावें लागेल, असें कूपर कवि खात्रीपूर्वक सांगतो. ह्या अगदीं चुकीच्या समजामुळें पुष्कळ विचारशील व धर्मभीरु माणसांना दुःख व काळजी वहावी लागते. पुष्कळ आनंदी स्वभावाच्या तरुणांस आपणांला सुख होतें, ह्मणून स्वतःला दोष लावून व त्रास करून घ्यावा लागतो. वास्तविक पाहिलें असतां ही आनंदी स्वभावाची देणगी ईश्वरानें दिली, एतदर्थ त्यांनीं ईश्वराचे आभार मानिले पाहिजेत. दुःखामुळें व दुखण्यामुळे ज्यांच्या हृदयांतील आनंदाचा व सुखाचा झरा सुकून गेला असेल, अशा माणसांचा आयुष्यक्रम सुखाचा करून देण्याचा अमूल्य हक्क आपणांकडे दिला आहे, असें वरील प्रकारच्या माणसांस वाटलें पाहिजे. कूपर हा स्वतः प्यूरिटन नव्हता. तरी त्याच्या लिहिण्यांत प्यूरिटन लोकांच्या मतांची थोडी बहुत भेसळ आहे. मेकॉले ह्मणतो- “ प्यूरिटन लोकांनीं अस्वलें झुंजविण्याचें बंद केलें तें त्यांना इजा होते ह्मणून नव्हे, तर त्यापासून पाहणारांना आनंद होतो ह्मणून."

 ह्या जननमरणाचें गुह्य काय हें शोधून काढण्यांत पुष्कळ लोक स्वतःला त्रास करून घेतात. तरी “ शहाण्या व धार्मिक माणसाला कधीं कधीं जगाचा संताप येतो, व कधीं कधीं त्याला