पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५१

 मोठ्या माणसांच्या किंवा सरकारच्या जुलुमांपासून आपला बचाव करण्याची जागा ह्मणून सध्यां आह्मांस घराची किंमत नाहीं; तर संसारांतील काळजी व चिंता विसरण्याची जागा एतदर्थ त्याची आह्मांस किंमत वाटते. ह्या भवसागरांतून पर्यटन करीत असतां, आपणास तुफानें लागतील असें माहीत असले पाहिजे; त्यांतून वांचविणारें हैं बंदर होय.
 मोठ्या भरभराटीस आलेल्या माणसास देखील असले दुःखाचे प्रसंग येतील; व नुसत्या भरभराटीच्या योगानें सुख व मनाची शांति मिळेल असें नव्हे.
 माणूस एकलकोंडे असावें किंवा नेहमीं स्वर्गसुखांत असावें अशी त्याची शरीररचना नाहीं. त्याचें हृदय घरांत गुंतून असलें पाहिजे, पण घराबाहेर कामकाज असणें बरें. नित्य एकांतवासांत किंवा चारचौघांच्या सोबतींत दिवस काढावे अशी ईश्वराची मर्जी दिसत नाहीं. दोन्ही चांगले आहेत; जरूरीचे आहेत असें देखील मी हाणेन.
 “जो सुंदर बाग मला आवडतो तो अगदीं भरवस्तीच्या जागीं नाहीं, किंवा वस्तीच्या जागेपासून अगदी दूर नाहीं. प्राणयात्रा किंवा लग्नसमारंभ यांचा सूचक घंटेचा आवाज हीच बातमी कामधंद्यांत गुंतलेल्या त्या शहरांतून आह्मांस ऐकावयास येते. गुरफटून टाकणाऱ्या हिरव्याचार पल्लवीच्या छायेमध्यें बसलें असतां देवळांतील घंटेचा नाद वायाबरोबर कानावर पडतो. तरी, तें शहर व आमचा बाग ह्यांच्या मध्ये मैलांचे मैल गवतानें आच्छादित मैदानें आहेत. त्यांतून एक रुंद नदी संथपणें वहात जाते. तींत पुष्कळ गलबतें चालतात. व हळू- हळू मारलेल्या वल्ह्यांच्या फटक्यानें पाणी उसळल्यामुळे तींतलीं कमळें हालतात. ती शेवटीं पुलाच्या तीन कमानीखालून जाते.