पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १२.


समाजांत वर्तन.

 प्रत्येक इंग्रज माणसाचें घर त्याच्या किल्याप्रमाणें आहे, असा आपला मोठा गर्व असतो, पण तें त्याहीपेक्षां जास्त वाटलें पा- हिजे; तें त्याला गृहाप्रमाणें वाटलें पाहिजे. आपलें घर त्याला किल्याप्रमाणें वाटतें तें कायद्यानें दिलेल्या हक्कामुळे; पण तें खऱ्या गृहाप्रमाणें वाटावयास लावणें हें त्याच्यावर अवलंबून आहे.
 आतां घर गृहाप्रमाणें कशामुळे वाटतें ? एकमेकांवरची प्रीति व ममता, आणि विश्वास ह्यांमुळे. लहानपणच्या आठवणी, आई- बापांचें प्रेम, तरुणपणच्या भरपूर आशा, बहिणीचा भावाबद्दलचा अभिमान, भावाचें बहिणीवरलें प्रेम, परस्परांवरील विश्वास, साधारण आशा, हिताहित व संकटें, इत्यादींच्या योगानें घर गृहाप्रमाणें वाटतें, व त्याबद्दल पूज्यबुद्धि उत्पन्न होते.
 जेथें प्रेम ही वस्तु नाहीं तो मग राजवाडा असला तरी देखील गृहाप्रमाणे वाटत नाहीं. खऱ्या गृहाचें जीवित प्रेम होय. “ज्याप्रमाणें आत्म्याशिवाय देह मनुष्य होत नाहीं, त्याप्रमाणे प्रेमाशिवाय घराला गृह ह्मणत नाहींत."

 "जो आनंदी स्वभावाचा असतो त्याची नेहमी दिवाळी असते; ईश्वराची भीति मनांत वागत असली, व जवळ थोडाच पैसा असला तरी चालेल; पण, अतोनात पैसा व तेवढेंच दुःख नको. प्रेमानें घातलेलें वरणभाताचें जेवण बरें; पण कलुषित मनानें दिलेलें मिष्टान्न नको. घरांत शांति असली ह्मणजे ओली कोरडी भाकर पत्करते; पण, तंटेबखेडे चाललेले असून जेथें यज्ञयागादि चाललें आहे असें घर नको."


 १ प्राव्हर्न्स.