पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४

“आपलें शेजार जेवढें गरीब तेवढा त्याला सुख होण्यास थोडा पैसा लागतो. निदान प्रत्यक्ष खर्चण्यास तरी थोडा लागतो. हें प्रथम दर्शनीं असत्याभासाप्रमाणें वाटेल, पण तें खरें आहेसें मला वाटतें.” गरीबांबद्दलची कळकळ व ममता ह्यांची पैशापेक्षां जास्त योग्यता आहे. जे लोक आपला वेळ मोडतात ते पैसा देण्यापेक्षां जास्त काम करितात. सारांश, पैसा व कार्योत्साह हीं एकत्र असली, व अनुभव आणि काम करण्याची संवय नसली ह्मणजे फायदा होण्याच्या ऐवजीं नुकसान होतें. एखादें काम वाईट रीतीनें केलें, तर तें न केल्यापेक्षां जास्त तोटा होतो.
 माणसास पैसा देण्यापेक्षां आशा दाखविणें व धीर देणें हें अधिक चांगलें. दुसऱ्यांचें ओझें आपण ब्रहाण्यापेक्षां त्यांचें त्यांना चाहतां यावें व आयुष्यांतील संकटांस मोठ्या धिटाईनें तोंड देतां यावें ह्मणून, त्यांच्यांत धीर व हिंमत आणणें हेंच उत्तम सहाय्य. इतरांस मदत करणें हें सोपें नाहीं. तें करितां येण्यास तीव्र बुद्धि च चांगला सारासारविचार पाहिजे; व अंतःकरण उदार पाहिजे.
 विपत्तींतून माणसांस सोडविण्याच्या भरांत, निढळच्या घामानें पैसा मिळविण्याची इच्छा समूळ नाहींशी न करण्याची खबरदारी ठेविली पाहिजे. माणासांकरितां कांहीं करूं लागलों ह्मणजे स्वतः मेहनत करण्याची इच्छा, व लोकांवर पोटासाठीं न पडण्याची भावना दुर्बळ होते. जे लोक इतर लोकांवर अवलंबून रहावयास शिकतात, ते दिवसेंदिवस भोजनभाऊ बनत जातात, ह्मणून होतां होईल तों मनुष्यांला पोटास भाकरी देण्याच्या ऐवजीं त्यांला दोन पैसे मिळवितां येतील अशी तजवीज करणें, व प्रत्यक्ष मदत करण्याच्या ऐवजीं, काम मिळेलसें करणें बरें. आपण माणसांस त्यांची जबाबदारी विसरण्यास लावितों, किंवा ती योग्य रीतीनें बजावण्यास त्यांस मदत करितों हा प्रश्न स्वतःला विचारावा.