पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांचा मनापासून तिटकारा केला असता. पुष्कळ लोकांना आपण पुढें मागें उपयोगी पडण्याजोगतें कांहींच करीत नाहीं हेंच आपण सुख भोगीत आहोंत असें वाटतें. कांहीं लोक कर्मेंद्रियांचीं सुखें हाच सुख ह्या शब्दाचा अर्थ घेतात. परंतु खरें पाहिलें असतां, मनाला होणारें सुख हें चिरस्थायी असून, अगदीं उत्कृष्ट आहे.

आपणास एक शरीर असतें, त्याची पण आपण हयगय करितों, अथवा बेपर्वाईनें त्याला इजा करून घेतों. आणि मनाची संपत्ति बहुतेक अंशीं शरीरसंपत्तीवर अवलंबून असते. कला- कुसरीच्या वस्तूंपासून जितकें सुख व्हावें त्याचें अर्धे देखील सुख आपणास मिळत नाहीं; नॅशनल गॅलेरी (चित्रमहाल) पहाण्यास लंडनामधील किती लोक गेले असतील कुणास माहीत ? निरनिराळ्या शास्त्रांचा उत्कर्षापकर्ष कळण्याजोगतें वळण आपण स्वतःला देत नाहीं. इंग्लंडांतील पदार्थसंग्रहालय किती लोकांनीं पाहिलें आहे? अथवा त्याची योग्यता कळण्यापुरती तयारी किती लोकांची आहे? ह्या भूतलावरील किंवा डोकीवर असलेल्या आकाशांतील सुंदर पदार्थांपासून आपलें चित्त जेवढ़ें रमावें तेवढें रमत नाहीं. एवढें खरें कीं आपण गायनकलेपासून बरेंच रंजन करून घेतों, तरी पण जितकें घ्यावें तितकें घेत नाहींच प्राण्यांना फक्त उपजतबुद्धि असते व मनुष्य मात्र विचारी प्राणी आहे अशी आह्मी शेखी मिरवितों तरी पण आमच्या बढाई मारलेल्या विवेकबुद्धीपासून माणसाच्या सुखास आह्मीं भर ती किती पाडली ? तारतम्यभावानें विचार केला तर आपणास मन असणें हें एक तोटा करणारें पिढिजाद आलेलें वतन आहे कीं काय, व सुख तर राहिलेंच पण दुःख देणारा हा एक झरा आहे कीं काय, असा संशय उत्पन्न होतो, व असला प्रश्न सिनीक लोकांनी केला देखील आहे.