पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०१


तयार झाली तरी हरकत नाहीं. एकादी उचकी, पाण्याचा थेंब, त्याला ठार मारण्यास पुरेसा आहे. जरी सृष्टीने त्यास चिरडण्याचा यत्न केला, तरी माणूस सृष्टीपेक्षां श्रेष्ठ; कारण, आपण मरतों हें त्याला कळतें. सृष्टी जरी त्याच्या विरुद्ध वागते तरी तिला त्याचा प्रभाव कळत नाहीं."
 मनुष्यप्राणी पूर्णतेस येण्यास अवश्य गुण कोणते ? तर, शांत स्वभाव, दयाळु हृदय, सयुक्तिक विचार व निरोगी शरीर. शांत डोकें नसलें तर आपलीं अनुमानें अविवेकाचीं होतात. दयालु स्वभाव नसला तर आपलपोटेपणा खास यावयाचा. शरीर निरोगी नसलें तर हातून फारसें काम होत नाहीं; व सारासारविचार नसला तर चांगले करण्याचा उद्देश असूनही आपले हातून हितापेक्षां अहितच जास्त होतें.
 मित्राची प्रशंसा करावयाची असल्यास तो सद्गृहस्थ आहे असें आपण ह्मणतों; आतां गृहस्थपणा कशांत आहे ? असा प्रश्न टॅकरेनें केला आहे. “प्रामाणिकपणानें वागणें, अंगीं सौ- म्यपणा, शौर्य व शहाणपण असणें ; व हे सर्व गुण असूनही बाहेर साजेल अशा रीतीनें तदनुरूप वागणें ह्याला गृहस्थपणा ह्मणतात काय ?"
 तो आणखी ह्मणतो- “सभ्य माणूस सांपडणें हें आपणांस वाटतें त्यापेक्षां अधिक कठिण आहे." राजा माणसांस पदव्या देऊं शकतो, पण त्यांचे सभ्य गृहस्थ करूं शकत नाहीं. तरी आपली इच्छा असल्यास आपणांस मोठें होतां येतें. आर्कडीकन फॅरार ह्मणतो – “मिताहार, दारूस न शिवणें, व शुद्ध वर्तन, ह्यांच्या योगानें ज्याचें आरोग्य कायम राहिलें आहे; आपल्या बांधवांनी जे उदात्त विचार बोलून ठेविले आहेत त्या विचारांवरून, व प्रत्यक्ष अनुभवावरून मिळविलेल्या