पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९३

वाटावी. हातून होईल तेवढी मेहनत करून देखील यश आलें नसल्यास आणखी नेटानें उद्योग करावा. ज्यांनी शाळेत तरतरी दाखविली नाहीं अशीं बरीच मुलें पुढें उदयास आलीं आहेत.
 वेलिंग्टन व नेल्सन हे शाळेत असतां मंद बुद्धीचे होते असें सांगतात. सर ऐझाक न्यूतन, स्विप्ट, क्लाईव्ह, सर वाल्टर स्कॉट, शेरिडन व दुसऱ्या पुष्कळ मोठ्या लोकांची अशीच गोष्ट होती.
 ह्यावरून, शाळेंत ज्यांनीं मुळींच नांव कमाविलें नाहीं, त्यांना शाळाशिक्षणाचा मुळींच फायदा झाला नाहीं असें निघत नाहीं उघड आहे. बुद्धिदाक्षिण्याची व्याख्या अपरिमित श्रम करण्याची योग्यता अशी केली आहे. ती बरीच खरी आहे. "नैसर्गिक बुद्धीची मदत नसली तर नुसत्या श्रमानें कांहीं व्हावयाचें नाहीं, व अभ्यास नसला तर नुसती नैसर्गिक बुद्धी व्यर्थ" असें लिली आपल्या मासलेवाईक भाषेत लिहितो.
 उलट पक्षीं पुष्कळ हुशार व तरतरीत मुलांस शरीरप्रकृति चांगली नसल्यामुळे, उद्योग न केल्यामुळे, अथवा शील चांगलें नसल्यामुळें पुढल्या आयुष्यक्रमांत अपयश येतें. गयेथी ह्मणतो अशीं मुलें “ज्या रोप्यांना पुरुष व स्त्रीजातीचीं फुलें असूनही फळें लागत नाहींत त्या रोप्याप्रमाणें" होत. असल्या मुलांस पुढें गाडी हाक्याचें हलकें काम करावें लागतें; किंवा ऑस्त्रेलियामध्यें मेंढ्यांची लोंकर कातरीत बसावें लागतें; अथवा पोटास धड पुरेल न पुरेल इतकेंच अन्न मिळविण्यास ग्रंथलेखनाचे कष्ट करावे लाग तात. या मुलांच्या मानानें कमी बुद्धीचीं पण जास्त मेहनती व नेकीनें वागणारीं मुलें उत्तरोत्तर वाढतात; त्यांस हुद्याचीं कामें मिळतात; व तीं स्वतःचें नांव करून देशाचें कल्याण करितात.