पान:आमची संस्कृती.pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८२ / आमची संस्कृती

 हा मनूचा श्लोक मेधातिथि व कुल्लुक यांनी फक्त गृहस्थाश्रमी लोकांसाठीच आहे असे धरले आहे, आणि केतकरांच्या मते गोविंदराज ह्या महाराष्ट्रीय असलेल्या टीकाकाराने मात्र, संन्याशानेही संततिप्राप्तीसाठी काही ठराविक दिवशी गृहस्थधर्म आचरिला तरी त्यास पाप लागत नाही, असे प्रतिपादन ह्या श्लोकाच्या जोरावर केले आहे. ज्ञानेश्वरादि भावंडे ही संन्याशाची संतती म्हणून त्यांच्यावर जो एक आक्षेप होता तो दूर करून, महाराष्ट्रातील संतशिरोमणीच्या जन्मावर जी पातकाची छाया पडली होती ती नाहीशी करावी असा बहुतेक गोविंदराजाचा हेतु असावा, असे आपले मत केतकरांनी तळटीपेत प्रदर्शित करून गोविंदराजाचे इतर टीकाकारांपेक्षा भिन्न मत का असावे, ह्याची छाननी केली आहे (पृष्ठ ५०). त्याच पुस्तकातील दुस-या एक तळटीपेत, वर्णव्यवस्था मानववंशाच्या भिन्नतेवर उभारली आहे ह्या पाश्चात्य पंडितांच्या कल्पनेने हल्ली हिंदुस्थानातील अर्धशिक्षितांत काय गोंधळ माजला आहे ह्याचे त्यांनी वर्णन केले आहे (पृष्ठ ७८). जर्मनीत हिटलरशाहीच्या स्थापनेनंतर वंशभिन्नतेवरून वर्णव्यवस्था करण्यात आल्यामुळे वंशसंकर न करू देणार आपण हिंदू कसे श्रेष्ठ आहोत ह्यावर पुण्यात भाष्य करणाच्या कानडेशास्त्र्यांचे व्याख्यान ज्यांनी ऐकिले असेल, त्यांना वरील तळटीपच महत्त्व ताबडतोब कळेल.
 प्रस्तुत 'History of Castes in India,' ह्या पुस्तकाला मानववंश-शास्त्रावर केतकरांनी एक लहानसे परिशिष्ट जोडिले आहे. त्यात मानववंशशास्त्राचे स्वरूप कसे मर्यादित आहे व समाजशास्त्रात त्याचा उपयोग करताना कशी दक्षता बाळगली पाहिजे ह्यासंबंधी अतिशय मननीय विचार व्यक्त केले आहेत. निरनिराळ्या मानववंशाना व त्यांच्या शाखांना जी नावे योजावयाची ती संस्कृतिनिदर्शक नसावीत तर प्रदेशनिदर्शक असावीत, अशी सूचना त्यांनी केली आहे. आय, सेमिटिक, द्रविड ही सर्व नावे विशिष्ट संस्कृती धारण करणाच्या लोकसमूहांची आहेत व त्या लोकसमूहांत नाना नावांच्या मानववंशाच्या शाखा असतील म्हणून तेच शब्द मानववंशाबद्दल लावू नयेत, तर शक्य तेथे भौगोलिक- उदाहरणार्थ ‘उत्तरेकडील मानववंश' (Nordic), ‘भूमध्य-समुद्राजवळील मानववंश, (Mediterranean) अशा-सारख्या